भारतीय संस्कृती 117
रघुवंशात शंकराच्या पार्वतीने कमरेवर घडे घेऊन देवदारू वृक्ष मुलांप्रमाणे वाढविले असे वर्णन आहे. आणि हत्ती वगैरे येऊन आपले अंग त्या देवदारू वृक्षांच्या अंगावर घाशीत व त्यांची सालडे काढीत म्हणून ती दु:खी होई, असे सांगितले आहे. शंकरांनी मग पहारेकरी ठेवले.
अमुं पुर: पश्यसि देवदारूम्
पुत्रीकृतोऽसौ वृषभध्वजेन
असे दिलीपराजाला तो पहारेकरी सिंह मोठ्या प्रेमाने सांगत आहे.
वृक्ष-वनस्पतींना आपण मानवी भावना दिल्या आहेत. उन्हाळ्यात तुळशीवर पाण्याची गळती लावावयाची व तिला उन्हाळा भासू द्यावयाचा नाही. सायंकाळ झाली, रात्र बाहेर पडली फूल-फळ तोडावयाचे नाही, तृणांकुर-पल्लव खुडायचा नाही, अशी पद्धत आहे. संकष्टी चतुर्थीच्या रात्री मंगलमूर्तीची पूजा करावयाची असते. परंतु दिवसाउजेडी फुले-दूर्वा आणून ठेवण्याची रीत आहे. झाडे रात्री निजतात अशी भावना आहे. त्यांची झोप मोडू नये म्हणून कोण ही काळजी ! एकदा महात्मा गांधीना पिंजणाच्या तातीला लावावयास थोडा पाला पाहिजे होता. रात्रीची वेळ होती. त्यांनी मीराबाईंना पाला आणावयास सांगितले. मीराबेन बाहेर गेल्या. लिंबाच्या झाडाची एक फांदी त्यांनी तोडून आणली. महात्माजी म्हणाले, “इतका पाला काय करावयाचा? मूठभर पाने आणावयाची. ही पाहिलीस का पाने कशी झोपली आहेत ती ! कशी मिटली आहेत. रात्री पाने तोडू नयेत. परंतु अगदी जरूरच पडली तर हलक्या हाताने आणावी. जरूर तितकीच. अहिंसेचा विचार करावा तेवढा थोडाच !” महात्माजींचे ते शब्द ऐकून मीराबाई सदगदित झाल्या.
कोकणात ज्या वेळेस गणपती आणतात, त्या वेळेस त्यांच्यावर पावसाळी वस्तू टांगण्यात येतात. काकडी, सहस्त्रफळ, दोडकी देवावर टांगतात. कांगण्या, कवंडळे देवावर टांगतात. नारळ, ओल्या सुपा-या टांगतात. सृष्टीचा सहवास देवाला प्रिय आहे.
मंगल समारंभात आम्रवृक्षाच्या पल्लवांशिवाय कधी चालावयाचे नाही. आंब्याचा टाळा नेहमी हवा. लग्न असो, मुंज असो, सत्यनारायण असो, घरभरणी असो, उदकशान्त असो, ऋतुशान्त असो, आम्रवृक्षाचे हिरवे पल्लव हवेत. सृष्टीचा आशीर्वाद हवा. आम्रवृक्ष म्हणजे प्रेम व पावित्र्य, माधुर्य व मांगल्य !
कोकणात नवान्नपौर्णिमा असते. त्या दिवशी दारावर शेतातील धान्याचे तोरण लावतात. भाताचिया लोंब्या, नाचणीची कणसे, झेंडू, कुरडू यांची फुले, आंब्याची पाने, या सर्वांमिळून ते तोरण गुंफतात. त्या तोरणाला ‘नवे’ हाच शब्द आहे. इंदूरला या राजवाड्याच्या दारावर गहू व खसखस यांची पिके दाखविलेली आहेत.
पशूपक्षी, वृक्षवनस्पती यांच्याशी असे स्नेहसंबंध भारतीय संस्कृतीने निर्माण केले आहेत. पशूपक्षी, वृक्षवनस्पती यांना जीव आहे. त्यांच्यातील चैतन्य दिसते. त्यांना जन्ममरण आहे, म्हणून सुखदु:खही आहे, असे आपण समजतो. परंतु भारतीय संस्कृती याच्याही पलीकडे गेली आहे.