भारतीय संस्कृती 60
जगात जोडणे कठीण आहे, तोडणे सोपे आहे. वृक्ष वाढविणे कठीण आहे, परंतु त्याला एका क्षणात तोडून टाकता येते. घर बांधणे कठीण, पाडणे सोपे. आपणांस जीवने जोडावयाची आहेत. ती संयमाने जोडता येतील.
आपण रेड्याला कमी मानतो. कारण तो संयमी नाही. तो सारखीच शिंगे उगारतो, साऱखेच डोळे वटारतो. आपण त्या पशूंना किंमत देतो, -जे संयमी आहेत, जे लगाम घालून घेतात, गा़डीला नीट चालतात, नांगर नीट ओढतात, जो घोडा लगाम घालून घेणार नाही, त्याला कोण जवळ करील ? त्याला कोण किंमत मोजील ? पशूला चामड्याचा लगाम घालावा लागतो. परंतु माणसाला काही असले लगाम घालावयाचे नाहीत. बुद्धी हा माणसाचा लगाम आहे. मनुष्य हा विचाराने वागतो. जो विचाराने वागणार नाही तो मनुष्य नाही. संयमी असणे ही मनुष्यत्वाची पहिली खूण आहे. परंतु ही खूण किती जणांजवळ आपणांस आढळेल ? आज जगात माणसे वृक-व्याघ्रासारखीच वागत आहेत ! परस्परांस खावयास उठली आहेत ! स्वतःस उच्च समजून दुस-यास तुच्छ लेखीत आहेत ! संयमाचा संपूर्ण अभाव दिसत आहे.
दोन दगड एकत्र जोडण्यास सिमेंट लागते. संयमाचे सिमेंट जर असेल, तरच जीवने जोडली जातील. परंतु प्रांत प्रांतास, राष्ट्र राष्ट्रास जोडले जाईल. परंतु अहंकार जर असेल तर हे साधणार नाही. एखाद्या प्रांताला उज्ज्वल भूतकाळ असतो. परंतु त्या उज्ज्वल भूतकाळाच्या अहंकाराने आपण इतरांस जर पदोपदी तुच्छ मानू लागलो तर काय फायदा ? अशा वेळेस उज्ज्वल भूतकाळ नसता तर बरे, असे वाटू लागते. ज्या इतिहासामुळे मी घमेंडखोर बनतो, मीच शहाणा-बाकी दगड असे मला वाटते. तो इतिहास नसलेला पत्करला. मला भूतकाळाच्या इतिहासापासून स्फूर्ती मिळावी, परंतु ती शेजारच्या भावास हिणविण्यासाठी नसावी. महाराष्ट्राने ही गोष्ट ध्यानात धरली पाहिजे.
संयम म्हणजे शरणता नव्हे. संयम म्हणजे नेभळटपणा नव्हे. संयम म्हणजे सामर्थ्य आहे. जीवनाच्या विकासासाठी तो आहे. कर्म उत्कृष्ट व्हावे म्हणून तो आहे. सेवा उदंड हातून व्हावी म्हणून तो आहे. समाजात आनंद अधिक यावा, संगीत अधिक यावे, म्हणून तो आहे. संयम ही सार्वभौम वस्तू आहे.