भारतीय संस्कृती 12
“जाळीन मी भेद। येथे प्रमाण तो वेद”
अशी तुकाराममहाराज प्रतिज्ञा करीत आहे. समाजाच्या कल्याणाची तळमळ असणारा प्रत्येक मनुष्य अशीच प्रतिज्ञा करील.
भारतीय संस्कृतीच्या उपासकांनो! केलेत पाप तेवढे पुरे. उठा व हरिजनांना पोटाशी धरा. सर्व पददलित जनतेला प्रेमाने कवटाळा. एकाच ईश्वराची आपण सारी लेकरे. एकाच शुभ्र-स्वच्छ चैतन्याची आपण रूपे. जितके जितके आपण प्रेममय होऊ, अद्वैत होऊ, तितके आनंदाने, भाग्याने उचंबळू.
जो दुस-यास तिरस्कृत करील, तो स्वत: तिरस्कारिला जाईल. जो दुस-यास तुच्छ लेखील, त्यालाही लाथा बसतील. आपण आपल्या पापांची फळे आज भोगीत आहोत. आपण दास्य पेरले, ते आज पोटभर मिळत आहे. आपण सर्वत्र गुलामगिरीला पुष्ट केले. पुरुषांची स्त्रियांवर लादलेली गुलामगिरी, स्पृश्यांची अस्पृश्यांवर गुलामगिरी, रावांची रंकांवरील गुलामगिरी, सावकारांची कुळांवरील गुलामगिरी, ज्ञानवंतांनी अज्ञानी जनतेवर लादलेली गुलामगिरी, शतमुखी गुलामगिरी आपण निर्माण केली व आज संपूर्णपणे गुलाम झालो आहोत. मराठ्यांचे राज्य अद्वैताच्या आधाराने निर्माण झाले. परंतु भेदाभेद निर्माण होताच ते नाहीसे झाले. ‘मराठा तितुका मेळवावा’ या मंत्राने मराठ्यांचे राज्य अस्तित्वात आले. परंतु ब्राह्मण, मराठे, प्रभु, शूद्र यांची आपापसांत स्पर्धा सुरू झाली, उच्च-नीचपणा सुरू झाला आणि भगवा झेंडा भस्मीभूत झाला. मराठे उत्तर हिंदुस्थानात गेले. त्यांनी रजपूत, जाट वगैरे लोकांना जवळ घेतले नाही, त्यामुळे मराठ्यांचा मोड झाला. हळूहळू ऐक्यमंत्र वाढवीत गेले पाहिजे होते. ‘मराठा तितुका मेळवावा’ असे सांगणारे समर्थ झाले. पेशव्यांच्या काळात ‘हिंदुमात्र मेळवावा’ असे सांगणारा दुसरा कोणी समर्थ पाहिजे होता; आणि आज ‘हिंदीमात्र मेळवावा’ असे सांगणारा महात्मा पाहिजे आहे.
जीवनात असे अद्वैत अनुभवणारे महात्मे हीच मानवजातीची आशा आहे. मनुष्यजातीला किती उंच जाता येते हे महापुरुष दाखवीत असतात. आकाशात कोट्यावधी अंशांच्या उष्णतेने सूर्य जळत असतो, तेव्हा आपल्या अंगात ९८ अंश उष्णता असू शकते. भगवान बुद्धासारखे महात्मे वाघिणीवरही प्रेम करतात, तेव्हा कोठे मनुष्य शेजारच्या माणसावर थोडी दया करावयास सिद्ध होतो. समाज पुढे जावा, वर जावा, यासाठी विश्वप्रेमी पुरुषाची नितान्त आवश्यकता असते. ते प्रेमाचा समुद्र जीवनात उचंबळवितील, तेव्हा कोठे प्रेमाचा बिंदू आमच्या जीवनात येणे शक्य आहे! संत हे आपल्या प्रेमाने व तपश्चर्येने समाजाचे धारण करीत असतात.
“सन्तो तपसा भूमिं धारयन्ति”