भारतीय संस्कृती 109
वकिलाच्या पत्नीला वाटेल की, “आपण सुखी आहोत. आपला पती पुष्कळ पैसे मिळवितो. आपल्या मुलाबाळांना कपडे आहेत. त्यांना नीट शिकता येते. रहायला सुंदर बंगला; लावायला फोनो, घरात गडीप्रमाणे, सारे काही आहे.”
परंतु तिने दृष्टी विशाल केली पाहिजे. “हे पैसे कोठून येतात?” माझा पती खोटेनाटे नाही ना करीत? शेतक-यांची भांडणे तोडण्याऐवजी ती कशी वाढतील असे तर नाही बघत? पती माझ्या अंगाखांद्यावर दागिने घालीत आहे. माझ्यासाठी रेशमी लुगडी आणीत आहे. परंतु ह्या वैभवासाठी तिकडे कोणी उघडे तर नाही ना पडत?” असा विचार स्त्रीने केला पाहिजे.
व्यापा-याच्या पत्नीने असेच मनात विचारले पाहिजे, “माझा पती गरिबांस छळीत नाही? गरिबांची मुलेबाळे उपाशी तर नाहीत ना? फाजील फायदा नाही ना घेत? फाजील व्याज नाही ना घेत? परदेशी मालाचा व्यापार नाही ना करीत?”
सरकारी नोकराच्या पत्नीने म्हटले पाहिजे, “माझा पती लाचलुचपत तर नाही ना घेत? कोठून येतात हे पैसे? कोठून येते हे तूप, हा भाजीपाला?” माझा पती अन्यायाने तर नाही ना वागत? अन्यायी कायद्याची तर अंमलबजावणी नाही ना करीत? नीट जनतेचे खरे हितच करीत आहे ना?”
भारतीय स्त्रिया असे प्रश्न स्वत:च्या मनास कधीही विचारीत नाहीत. पती त्यांना अज्ञानाच्या अंधारात ठेवतात. परंतु पापात त्याही भागीदार असतात, हे त्यांनी विसरता कामा नये. माझा सावकार पती हजारो शेतक-यांना रडवून मला शेलाशालू घेत आहे, माझा डॉक्टर पती गरीब भावाबहिणींपासूनही कितीतरी फी उकळून मला माझ्या महालात हसवीत आहे, माझा अधिकारी नवरा रयतेला गांजून पैसे आणीत आहे, असा विचार जर भारतीय स्त्रियांच्या हृदयात जागा झाला, तर त्या खडबडून उठतील. कारण धर्म हे भारतीय स्त्रियांचे जीवन आहे.
भारतीय स्त्रिया देवदेव करतात. परंतु आपला संसार पापावर चालला आहे; ही गोष्ट अज्ञानाने त्यांना कळत नाही. भारतीय स्त्रियांनी असे अज्ञानात नाही राहता कामा. दृष्टी व्यापक व निर्भेळ केली पाहिजे. तरच जीवनात धर्म येईल. पती पैसे कोठून कसे आणतो ते माहीत नाही आणि दानधर्म केलेला; देवापुढे टाकलेला; क्षेत्रात दिलेला पैसा कोठे जातो त्याचाही पत्ता नाही. घरी पती पैसे आणीत आहे तेही पापाने, व दानधर्मातील पैसेही चालले आलस्य, दंभ, पाप, व्यभिचाराकडे! ही गोष्ट स्त्रिया विचार करू लागतील तरच त्यांना कळेल.
आणि मग ती रेशमी वस्त्रे त्यांचे अंग जाळतील! ते दागिने निखारे वाटतील! त्या माड्या नरकाप्रमाणे वाटतील! आपल्या पतीला सन्मार्गावर आणण्याची त्या खटपट करतील.