भारतीय संस्कृती 82
आज मानवी समाजात हे यज्ञतत्त्व पाळण्यात येत नाही, म्हणून मानवी समाज दु:खी आहे. काही वर्ग दुस-यासाठी सारखे झिजत आहेत. परंतु त्यांची झीज भरून काढण्यासाठी मात्र कोणी झिजत नाही. मजूर झिजून झिजून भांडवलदारांसाठी चिपाड होत आहेत. भांडवलदार झिजून झिजून मजुरांसाठी चिपाड होत नाही. तो सारखा लठ्ठच होत आहे! त्याच्या मोटरी वाढत आहेत. त्याची चैन वाढत आहे. मजूर सुखी व्हावेत म्हणून ही चैन कमी होत नाही. परंतु सृष्टी सांगते, ''मेघांसाठी नद्या कोरड्या झाल्या, वापी-तलाव शुष्क झाले, पुष्करिणी आटल्या; परंतु त्यांना भरून टाकण्यासाठी मेघ रिकामे होतील. '' मेघाजवळची पाण्याची संपत्ती नदीवाल्यांनी उन्हाने वाफाळून दिली आहे. त्या नदीनाल्यांची ती तपश्चर्या, ती प्राणमय सेवा मेघ विसरत नाहीत. ते कृतज्ञतेने ओथंबून खाली येतात व सर्वस्व अर्पण करून रिते होतात. पुन्हा त्या भरलेल्या नद्या प्रेमाने आटून मेघांना भरून टाकतात. असा या प्रेमाचा अन्योन्य यज्ञधर्म आहे.
मजुरांनी म्हणावयाचे, ''शेठजी! तुमच्यासाठी आम्ही यंत्राजवळ झिजतो, सारी संपत्ती तुमच्या हातात देतो; घ्या. '' शेठजीने म्हणावयाचे, '' बंधूनो! ही सारी संपत्ती तुमच्या हातात देतो; घ्या '' अशा रीतीनेच समाजात आनंद राहील.
परस्पर जर याप्रमाणे वागतील, तर समाजात समता राहील. एकीकडे खळगे व एकीकडे टेकाडे दिसणार नाहीत. एकीकडे प्रचंड प्रासाद व एकीकडे क्षुद्र झोपड्या हे दु:ख दिसणार नाही. एकीकडे आनंदमय संगीत तर दुसरीकडे शोकाचे रडगाणे, असा हृदयभेदक देखावा दिसणार नाही.
पाण्याचा धर्म समान पातळीत राहणे हा आहे. तुम्ही पाण्यातून एक घागर भरून घ्या. तेथ झालेला तो खळगा भरून काढण्यासाठी आजूबाजूचे सारे जलबिंदू धावतात. तो खळगा भरून येतो. एका क्षणार्धात भरून निघतो. तो खळगा पाहण्यास आजूबाजूच्या बिंदूंना आनंद वाटत नाही. परंतु याच्या उलट रस्त्यावरचे खडीचे ढीग पाहा, एकाबाजूने खडी नेलीत तर तेथील खळगा भरून काढण्यासाठी आजूबाजूची खडी धावणार नाही. तो खळगा आपणांस दिसतो. चार-दोन खडे, अगदी जवळचे खडे धावतात. परंतु पुष्कळ गंमतच पाहतात. दगडच ते! त्यांना थोडेच दु:ख आहे?
समाजात हीच दगडांची स्थिती आहे. पाण्याच्या बिंदूप्रमाणे आपण सहृदय नाही म्हणूनच जीवन सुकत चालले आहे. आपण परस्परांचे खळगे भरून काढून समता निर्मीत नाही. यज्ञधर्माचा लोप झाला आहे. अग्निहोत्रांचे यज्ञ व बोकडांचे यज्ञ विक्षिप्त लोक पुन्हा सुरू करीत आहेत. परंतु ''परस्परं भावयन्त: श्रेय: परमवाप्स्यथ'' ; एकमेकांची काळजी घेऊन, एकमेकांबद्दल भावना बाळगून, आनंद मिळवून घ्या; खरे कल्याण, खरे श्रेय (स्वत:चे फक्त नव्हे) प्राप्त करून घ्या असे जे भगवद्गीत यज्ञकर्म, त्याचे पुनरुज्जीवन करावयाचे कोणाच्याच मनात नाही. आणि ''हे यज्ञकर्म करा; झिजणा-या मजुरांची, श्रमणा-या शेतक-यांची झीज नीट भरून काढा'' असे अट्टहासाने सांगणा-या साम्यवादी, ध्येयवादी जवाहरलालसारख्यांची धर्मशून्य म्हणून संभावना होत आहे! जवाहरलाल गीतेचा महान यज्ञधर्म आचरा व परमश्रेय प्राप्त करून घ्या असे सांगत आहेत. थोर यज्ञधर्माची दीक्षा यज्ञहीनांस देऊ पाहणारे ते थोर धर्मसेवक आहेत.
साम्यवादी लोक म्हणत असतात. ''धर्म वगैरे आम्हांस काही समजत नाही. धर्म म्हणजे अफूची गोळी आहे. आम्हाला सर्वांना सुखी कसे करावे याची प्रखर चिंता आहे. हाच आमचा धर्म. '' साम्यवादी लोक 'धर्म' या शब्दाला का कंटाळणार नाहीत? जो धर्म लाखो लोकांची दैना आनंदाने बघतो, तो का धर्म? त्या धर्माचे नाव त्यांना कसे सहन होईल?