भारतीय संस्कृती 105
भक्त हे देवाचे देव होत असतात. ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी फारच सुंदर ओव्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, “अर्जुना! भक्त हे माझे परम थोर दैवत.”
“तो पहावा ऐसे डोहळे । म्हणून अचक्षूसी मज डोळे
हातींचेनि लीलाकमळे । पुजूं तयातें ।।
दोंवरी दोनी । भुजा आलों घेवोनी
आलिंगावया लागोनी । तयाचे आंग ।।”
भक्ताला पूजिण्यासाठी देवाच्या हातात कमळ, भक्ताला मिठी मारण्यासाठी दोन हात पुरणार नाहीत म्हणून चार हात! भक्ताला पाहावयाचे डोहाळे होतात म्हणून निराकार प्रभू साकार होतो! किती गोड आहे हा भाव !
आपण प्रेमाने ज्याचे दास होऊ, तो आपलाही दास होतो. प्रेमाने दास होणे म्हणजे एक प्रकारे मुक्त होणे. परंतु आपल्या कुटुंबात काय अनुभवास येते? स्त्री सर्वांची सेवा करीत आहे. ती सर्वांची प्रेममयी दासी आहे, परंतु तिचे दास कोण आहे? तिला सुख व्हावे, तिला आनंद व्हावा, तिच्या हृदयाला विसावा मिळावा म्हणून कोणाला चिंता का? स्त्रीच्या मनाच्या व हृदयाच्या भुका कोणाला माहीत आहे का? तिची आन्तरिक दु:खे कोणाला कळतात का? तिची कोणी प्रेमाने विचारपूस करतो का?
स्त्रीच्या हृदयात कोणीच शिरत नसेल! सारे स्त्री-जीवनाच्या अंगणात खेळत असतात! तिच्या अंतरंगाच्या अंतर्गृहात कोणीही जात नाही. ते अंतर्गृह उदास आहे. तेथे प्रेमाने कलश घेऊन कोणी जात नाही. स्त्रीहृदय हे सदैव मुकेच आहे! स्त्रिया मुक्या असतात. त्यांची हृदये फार गूढ व गंभीर असतात. त्या प्रेमयाचना करीत नाहीत. हृदयाला ज्याची तहान आहे ते प्रेम असो की बाहेरची भाजी असो, स्त्री त्याची मागणी करणार नाही. जे आणून द्याल ते ती घेईल.
भारतीय स्त्रियांच्या हृदयाची कल्पना भारतीय पुरुषांस फारशी नसते. स्त्रियांना खायला-प्यायला असले, थोडेसे नीट नेसायला असले म्हणजे झाले, त्यापेक्षा स्त्रियांना काही अधिक पाहिजे असते असे त्यांना वाटतच नाही! त्यांना स्त्रियांच्या आत्म्याचे दर्शन नसते. स्त्रियांना आत्माच नाही असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, आणि जेथे आत्माच नाही तेथे मोक्ष तरी कशाला?
भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाचा पुरुष अगदी अनाठायी फायदा घेतात. कधी कधी ते घरात काडीइतकेही लक्ष देत नाहीत. मुलाबाळांचे पाहणार नाहीत. दुखलेखुपले पाहणार नाहीत. रात्री जागरण करणार नाहीत. मूल रडू लागले तर आदळआपट करतील. बिचारी माता त्या मुलाला मांडीवर घेऊन बसते. त्याला पायांच्या पाळण्यात घालते. ती रडकुंडीस येते. पतीची झोपमोड होऊ नये म्हणून किती जपत असते!