भारतीय संस्कृती 111
पतीचे सहस्त्र अपराध पोटात घालून त्यालाही सांभाळणारी, आपल्या मुलाबाळांना सांभाळणारी, आणि भारतीय ध्येय सांभाळणारी, अशी जी ही भारतीय माता,- तिला अनंत प्रणाम!
आणि पतीबरोबर चितेवर हसत चढणारी सती किंवा पतीनिधनोत्तर त्याचे चिंतन करीत वैराग्याने व्रतमय जीवन कंठणारी गतभर्तृका! या दोन वस्तूंचे कोण वर्णन करील? भारतातील सतीची वृंदावने लग्न म्हणजे काय यावरची मूक प्रवचने आहेत. ही वृंदावने भारतास पावित्र्य देत आहेत. ठिकठिकाणी हे यज्ञमय इतिहास लिहिलेले आहेत.
आणि गतधवा? गतधवा नारी म्हणजे क्षणोक्षणीचे चितारोहण ! भारतीय बालविधवा म्हणजे करुण- करुण कथा आहे. आजूबाजूच्या विलासी जगात तिला विरक्त राहावयाचे असते. प्रत्येक क्षण म्हणजे कसोटी! मंगल वाद्ये तिच्या कानांवर येतात. मंगल समारंभ होत असतात. कोठे विवाह आहे; कोठे डोहाळेजेवण आहे, कोठे ओटीभरण आहे; कोठे बारसे आहे; परंतु तिला सारे समारंभ व्यर्ज! कोप-यात गळा कापलेली ही कोकिळा बसलेली असते! व्रते-वैकल्ये तिच्यावर लादण्यात येतात. सारे विधिनिषेध तिच्यासाठी. सारे संयम तिच्यासाठी.
अशा आगीतून ती दिव्य तेजाने बाहेर पडते. बाळकृष्णाशी बोलते. त्याला नटवते. त्याला नैवेद्य देते. देव हे तिचे मूल. देवाची ती माता होते. ती यशोदा होते, परंतु या यशोदेला अपयशी समजण्यात येते! तिचे दर्शन नको! जिच्या पायाचे तीर्थ घेऊन सारे गाद्यांवरचे संत उद्धरत जातील, तिला हे सारे गादीमहाराज अशुभ समजत असतात!
सर्वांची सेवा हे तिचे काम. कोणाची बाळंतपणे करील, कोणाचे स्वयंपाक करील. कोठे कुटुंबात अडले की तिकडे झाली पाठवणी. तिला मोकळीक नाही, गंमत नाही, आनंद नाही. जगातील सारे अपमान सोसून जगाचे भले चिंतणे हे तिचे ध्येय असते.
भगवान शंकर हलाहल पिऊन जगाचे कल्याण करतात. तसेच गतधवेचे आहे. ती निंदा, अपमान, शिव्याशाप, यांचे विष मुकाट्याने पीत असते. आणि पुन्हा सेवेस सिद्ध!
आदर्श विधवा जगाची गुरू आहे! ती संयम व सेवा यांची मूर्ती आहे. स्वत:चे दु:ख गिळून जगासाठी झटणारी ती देवता आहे.
भारतीय संस्कृतीत हा महान आदर्श आहे अशा दिव्य देवतेसमोर सतरांदा लग्न करणारे पुरूष सूकरासारखे वाटतात. स्त्री जातीची धन्यता वाटते.
आदर्श उच्च असावा. परंतु ज्याला तो झेपत नसेल त्याला तो देण्यात अर्थ नाही. श्रीकृष्ण मारूनमुटकून अर्जूनाला संन्यासी करू इच्छित नाही. बालविधवांना तर आईबापांनी कुमारिका समजूनच त्यांचे पुन्हा विवाह लावून द्यावेत. परंतु यातही त्यांना स्वातंत्र्य असावे. स्त्रीजातीचे उदात्त ध्येय त्यांना पूजावयाचे असेल तर मोकळीक असावी. परंतु फार उंच उंच पकडावयाला गेल्यामुळे पडण्याचा संभव असतो. त्यापेक्षा जरा खालचे ध्येय घेऊन तेथे नीट पाय रोवून राहणे अधिक श्रेयस्कर आहे.
भारतीय स्त्रियांच्या पावित्र्याची, संयमाची, वैराग्याची धन्य आहे! भारतात आज शेकडो वर्षे ओतलेले हे वैराग्य का जाईल? भारतीयांच्या उज्ज्वल भवितव्यास त्यापासून खत नाही का मिळणार? भारतीय सतींनो! तुमचा दिव्य महिमा वर्णावयास मला शक्ती नाही. तुमची चित्रे माझ्या अंतश्चक्षूंसमोर मी आणतो व तुमचे पाय भक्तीच्या अश्रुजलाने धुतो. दुसरे मी क्षुद्र पामर काय करणार?