भारतीय संस्कृती 89
आणि कधी कधी मिश्रविवाह समाजाच्या हितासाठीही असतील. जमिनीत एकच पीक सारखे घेत नाहीत. मध्येच बी- वाढ करावयास दुसरे पीक घेतात. बी-वाढीसाठीच दुसरे पीक! मध्येच एक वर्ष दुसरे पीक घेतले म्हणजे पुन्हा ते पाहिले पीक भरदार येते, समाजाच्या संततिशास्त्रातही अशी वेळ कदाचित येत असेल. मिश्रविवाहाने समाज कदाचित भरदार होईल. सर्वसाधारण जनतेचा उत्साह व सर्वसाधारण जनतेची बुध्दी यांची कदाचित वाढ होईल. भारतातील सारे प्राचीन महर्षी मिश्रविवाहाची फळे होत. ''ऋषींचे पाहू नये कूळ, नदीचे पाहू नये मूळ'' असे आपण म्हणत असतो. परंतु त्यात ऋषीला कमीपणा थोडाच आहे? मिश्रविवाह हे कधी कधी आवश्यकही असतील. आज भारतात ती वेळ आली आहे असे वाटते.
मांस खाऊन आपणांस जोम येणार नाही, तर मिश्र विवाहाने जोम येईल. दोन सर्पांपासून जन्मणारा अक्करमाशा हा अधिकच क्रूर असतो. याचा अर्थ मिश्रविवाहाचे फळ जो अक्करमाशा तो अधिक जोमदार असतो. सर्पांचा दृष्टपणा अधिक वाढीचा लागतो.
मिश्रविवाह सदैवच असावा असे नाही. परंतु काही विश्ष्टि काळी काही शतके त्याची जरुरी असेल, काही काळ गेल्यावर समाजाची स्थिती पाहून पुन्हा नवीन नियम करा. अशा सर्व रीतींनी कामशास्त्राचे खरे धार्मिक व बौध्दीक विवेचन व आचरण झाले पाहिजे. कामशास्त्र म्हणजे एक प्रकारे संततिशास्त्र. संतती सतेज निरोगी कशी होईल, त्याचप्रमाणे संततीचे नीट पोषण व विकसन कसे होईल, हे सर्व पाहणे धर्ममय कामशास्त्रात येते.
संयम स्त्री-पुरुषांचे प्रेम, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांचे शारिरीक निर्दोषत्व व बौध्दीक समानत्व इत्यादी अनेक गोष्टी प्रकाशात पहाव्या लागतील. ज्ञान वाढते आहे. अनुभव वाढत आहे, वेद अनंत आहेत, वेदांवर म्हणजे अनुभवांवर, शास्त्रीय ज्ञानावर उभारलेला हा सनातन धर्म नवनवनी प्रकाश जीवनात आणील व खरे धर्ममय अर्थशास्त्र व धर्ममूल कामशास्त्र जनतेस देऊन ख-या शांतीचा, ख-या आनंदाचा, ख-या निश्चित व निर्मळ सुखाचा मोक्ष सर्वांनी देईल.
सर्व समाजाचे धारणपोषण करणारे अर्थ-काम हे मोक्षाकडे नेत असतात. परंतु अशा रीतीने अर्थ-कामांची ज्ञानविज्ञानमय, शास्त्रीय, म्हणजेच धार्मिक व्यवस्था लावू पाहणारे, आज नरकाकडे नेणारे समजण्यात येत आहे, हा केवढा दैवदुर्विलास!