भारतीय संस्कृती 29
उपनयन म्हणजे गुरूजवळ नेणे. कोणत्या गुरूजवळ न्यावयाचे? मुलाच्या विशिष्ट वर्णाचा विकास करू शकणा-या गुरूजवळ न्यावयाचे. संगीताची आवड असणा-या मुलाला आकडेमोड करणा-या शिक्षकाकडे नेऊन काय फायदा? तो त्या मुलाची संगीताची वृत्ती गुदमरवून टाकील. बाल-कोकिळाचा गळा दाबला जाईल. तो त्या मुलाच्या आत्म्याचा वधच होय.
ज्या राष्ट्रात, ज्या राज्यपद्धतीत व्यक्तीच्या वर्णाचे शास्त्रीय संशोधन होऊन त्याच्या वर्णाच्या विकासाला पूर्णपणे अवसर असतो, त्या वर्णविकासाच्या मार्गातील सा-या अडचणी दूर करण्यात येत असतात, ते राष्ट्र परम थोर होय. तेथील राज्यपद्धती खरी आदर्शभूत समजली पाहिजे.
परंतु स्वराज्य आल्याशिवाय हे कसे शक्य होईल? स्वराज्य यासाठी लागावे, यासाठी स्वराज्य पाहिजे. जोपर्यंत स्वराज्य नाही तोपर्यंत खरा वर्ण नाही. नामधारी वर्ण तोपर्यंत दिसतील. परंतु व्यक्तींच्या गुणधर्मांचे शास्त्रीय परीक्षण-निरिक्षण होणार नाही. विकासातील अडथळे दूर होणार नाहीत.
आज शाळेतील शिक्षकास कोणते अनुभव येतात? निरनिराळ्या गुणधर्मांच्या मुलांची आज कत्तल होत आहे. सर्वांना सदैव एकच शिक्षण. वर्ण-विकासास आज अवसर नाही. दारिद्र्यामुळे आज कोणत्याही मुलाला स्वत:च्या आवडीचे शिक्षण घेता येत नाही.
एखाद्या श्रीमंताला स्वत:च्या वर्णाप्रमाणे वागता येईल. परंतु सर्वांना ते शक्य आहे का? लोकमान्य टिळकांचा कोणता वर्ण होता? तत्त्वज्ञानात रमावे, गणितशास्त्र डुंबावे हा त्यांच्या आत्म्याचा धर्म होता. कदाचित त्यांना त्या गुणधर्माचा विकास करणे शक्य झाले असते. परंतु त्यांच्या डोळ्यांना दिसले की, लाखो जीवांना आपल्या गुणधर्मांचा विकास करून घेणे या सर्वभक्षक पारतंत्र्यात शक्य नाही. म्हणून ते म्हणाले, “सर्वांच्या विकासमार्गात आड येणारे पारतंत्र्य हे आधी दूर करू या.” स्वराज्यासाठी लोकमान्य गेले, राष्ट्राचा वर्ण विकास नीट व्हावा, राष्ट्रात खरा वर्णधर्म आज ना उद्या केव्हा तरी यावा; म्हणून ते अविरत श्रमले.
महात्मा गांधी एकदा असेच म्हणाले. समाजसुधारक वृत्तीचे महात्माजी, परंतु राष्ट्राच्या विकासात पारतंत्र्य हा मोठा अडथळा असल्यामुळे तो दूर करण्यासाठी ते उठले. इतिहासाचार्य राजवाडे दु:खसंतापाने म्हणत, “पदोपदी स्वराज्याची आठवण येते.” स्वराज्य असते, तर राजवाड्यांनी केवढा ज्ञानप्रांत जिंकून घेतला असता याची कल्पनाही करवत नाही.
कितीतरी कलावान, कितीतरी शास्त्रज्ञ, कितीतरी शोधक बुद्धीचे कल्पक दास्यात धुळीत पडून मरतात. पारतंत्र्यात सर्वांत मोठे नुकसान जगाचे होत असेल, तर ते हेच होय.
वर्णविकासासाठी स्वराज्य पाहिजे. परंतु कोणत्या प्रकारच्या स्वराज्यात सर्वांच्या वर्णांचा विकास होईल? जे स्वराज्य मूठभर भांडवलवाल्यांचे आहे, त्या स्वराज्यात गोरगरिवांच्या मुलांचे गुणधर्म नीट संवर्धिले जातील का? सर्वांचा वर्णविकास व्हावयास पाहिजे असेल, तर साम्यवादाशिवाय गत्यंतर नाही. साम्यावादी राज्यपद्धतीतच सर्वांचे योग्य ते उपनयन होईल.