भारतीय संस्कृती 78
अर्थ आणि काम या ज्या दोन प्रवृत्ती त्यांतही अर्थाचे स्थान आधी, हे भारतीय संस्कृतीने ओळखले, आणि अशा ह्या दोन वृत्तीच्या पाठीमागे धर्माचे बंधन ठेवले. अर्थ- काम धर्माने नियंत्रित करा. धर्माने नियंत्रित करणे म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे का शेंडी? धर्म म्हणजे का गंध? धर्म म्हणजे का माळा? धर्म म्हणजे का जानवे? धर्म म्हणजे का हरिहरी म्हणणे? जप करणे? धर्म म्हणजे का काही न करता भोग भोगायचे? धर्म म्हणजे का घंटा वाजविणे, शंख फुकणे? धर्म म्हणजे का वाद्यबंदी? धर्म म्हणजे का वाद्ये वाजविणे? धर्म म्हणजे काय?
धर्माची अत्यंत शास्त्रीय व्याख्या भारतीय संस्कृतीने केली आहे. ''धारणात् धर्म: ही ती व्याख्या. सर्व समाजाचे धारण ज्याने होते तो धर्म. धारण कोणाचे? माझे, माझ्या जातीचे, माझ्या देशाचे, मानवजातीचे, का चराचर सृष्टीचे? मानव हा सर्व सृष्टीतील थोर प्राणी आहे. थोरवी फुकाफुकी मिळत नसते. थोरवी म्हणजे जबाबदारी. मानवाने मानवाशी कसे वागायचे याचा विचार पाहिजेच; परंतु पशुपक्ष्यांशी, तृणवृक्षवनस्पतींशी, नदीनाल्यांशी कसे वागावे याचेही विवेचन मानवी नीतीशास्त्र करील.
मनुने आपल्या स्मृतीला 'मानवधर्मशास्त्र' असे नावे दिले. आर्याचे, भारतीयांचे, असे नाव त्याने दिले नाही. मनू मानवांचा धर्म सांगत आहे. मनू त्याच्या दृष्टीने मानव्याचा आचार सांगत आहे. मनूचे विचार आज पटणार नाहीत. त्याची दृष्टी आज सदोष वाटेल, परंतु मनू मानवजातीचा विचार करीत आहे ही गोष्ट थोर आहे. 'मानवधर्मशास्त्र' हा शब्दच हृदयाला व बुध्दीला आनंद देतो.
तेव्हा धर्म कल्याण करणार ते मानवजातीचे. मानवेतर सृष्टी क्षणभर दूर ठेवू या. निदान मानवाचे कल्याण तरी पाहू या. मनू सांगतो, ''सर्व मानवांचा विचार करा. '' अर्थशास्त्र सर्व मानवजातीच्या कल्याणावर उभारलेले असले पाहिजे. जे अर्थशास्त्र विविक्षित जात, विविक्षित धर्म, विविक्षित राष्ट्र यांचाच विचार करते, ते अर्थशास्त्र धर्ममूल नाही. धर्ममूल अर्थशास्त्र सर्वांचा विचार करील.
हिंदुस्थानला भिकारी करुन इंग्लंड धन-कनक-संपन्न होणार असेल, तर इंग्लडचे अर्थशास्त्र अधर्ममूलक आहे. चीनचा गळा दाबून जपान गबर होत असेल, तर जपानचे अर्थशास्त्र अन्यायाचे आहे. अनार्य जातींना दास करून केवळ आर्यांचा उदो उदो करू पाहणारे अर्थशास्त्र सदोष आहे. मुसलमानांस वगळून केवळ हिंदुंना श्रीमंत करणारे अर्थशास्त्र सनातन संस्कृतीचे नाही. ब्राह्मणेतरांना वगळून ब्राह्मण श्रीमंत होऊ पाहतील, हरिजनांना वगळून ब्राह्मणेतर धनिक होऊ पाहतील, महाराष्ट्राला मारून गुजरात श्रीमंत होत असेल. बंगालला बुडवून मारवाडी कुबेर होत असतील, तर तेथे धर्ममय अर्थशास्त्र आहे असे म्हणता येणार नाही. कुळांना लाचार करून, रात्रंदिवस गुलामांप्रमाणे राबवून, त्यांनी पिकविलेले आयते आपल्या कोठारात भरून श्रीमंत होणारा जमीनदार पापी आहे. मजुरांना दहा- दहा तास बैलांप्रमाणे राबवून पोटभर खायला न देणारा, त्यांच्या राहण्याची नीट सोय न लावणारा, त्यांच्या मुलांबाळांची फिकीर न करणारा, त्यांना पगारी रजा न देणारा, त्यांच्या सुखाची काळजी न करणारा, असा श्रीमंत होणारा कारखानदार हा पापी आहे. ह्या सर्वांचे अर्थशास्त्र अन्यायावर, अधर्मावर उभारलेले आहे. शेतक-यांला पिको न पिको, भरमसाठ व्याजाचे दर आकारून त्याच्या पिकावर जप्ती नेऊन त्याच्या घरदारावर नांगर फिरविणारा, त्याची आवडती गायीगुरे बांधून घेऊन जाणारा, मुलाबाळांना अन्नास मोताद करणारा, खुशालचेंडू, हृदयहीन, कृपणमति सावकार हा अधर्मांचे अर्थशास्त्र चालवीत आहे.