भारतीय संस्कृती 178
जीवन कसे जगलो, याची परीक्षा म्हणजे मरण. तुमच्या मरणावरून तुमच्या जीवनाची किंमत करण्यात येईल. जो मरताना रडेल, त्याचे जीवन रडके ठरेल. जो मरताना हसेल, त्याचे जीवन कृतार्थ समजण्यात येईल. थोरांचे मरण म्हणजे एक दिव्य वस्तू आहे, ते अनंताचे दर्शन आहे. किती शांती, किती समाधान !
सॉक्रेटीस मरताना अमृतत्त्व भोगीत होता. गटे मरताना म्हणाला, 'अधिक प्रकाश, अधिक प्रकाश.' तुकाराम महाराज 'रामकृष्ण हरि' करीत गेले. समर्थ म्हणाले, 'माझा दासबोध आहे, रडता का ?' लोकमान्य 'यदा यदा हि धर्मस्य' हा श्लोक म्हणत गेले. पंडित मोतीलाल नेहरू गायत्रीमंत्र म्हणत गेले. देशबंधू दास 'आलो, तुझ्या प्रियतम दारात दिवा पुन्हा पेटविण्यासाठी आलो' असे म्हणाले. हरिभाऊ आपट्यांजवळ मरताना नामदार गोखले म्हणाले, 'हरिभाऊ ! या जगाची गंमत पाहिली. आता त्या जगातील पाहू.' भगिनी निवेदिता निजधामाला जाताना म्हणाल्या, 'तो पहा उष:काल होत आहे. भारताचा उष:काल येत आहे. प्रकाश पाहून मी मरत आहे. धन्य !' शिशिरकुमार घोष चैतन्यचरित्रामृताचा जो शेवटला भाग, त्यातील शेवटच्या पानातील शेवटच्या ओळीचे मुद्रित पाहून म्हणाले, 'आता माझे काम संपले. निताई गौर ! घ्या आता मला पदरांत.' हे शब्द बोलून त्या महापुरुषाने डोके उशीवर टेकले ते टेकलेच ! महात्मा गांधींचे प्राण पुण्यश्लोक मगनलाल गांधी, 'मंगल मंदिर खोलो, देवा ! दार उघड. दिव्य प्रेमामृताची तहान लागलेला हा बालक तुझ्या दारात येत आहे. प्रेमाचा पाऊस पाड. या संसारात भटकून भटकून दमलेल्या या बाळाला पोटाशी घे. तुला गोड हाका मारणा-या या मुलाजवळ देवा, गोड गोडवे बोल. उघड, तुझे मंगल दार उघड.' अशा अर्थाचे दिव्य गीत म्हणत निजधामास गेले.
जगात अशी कितीतरी थोर महाप्रस्थाने झाले असतील. मरण म्हणजे मेवा. मरण म्हणजे शांती. मरण म्हणजे नवजीवनाचा आरंभ. मरण म्हणजे आनंदाचे दर्शन. मरण म्हणजे पर्वणी. जिवाशिवाच्या ऐक्याचे संगीत. मरण म्हणजे प्रियकराकडे जाणे.
कर ले शृंगार चतुर अलबेली ।
साजन के घर जाना होगा । ।
मिट्टी ओढावण मिट्टी बिछावन ।
मिट्टीमें मिल जाना होगा । ।
नहाले धोले शीस गुंथा ले ।
फिर वहाँ से नहिं आना होगा । ।
"आज प्रियकराच्या घरी जावयाचे आहे. शृंगार-साज सारा कर. मातीची ओढणी अंगावर घे. मातीच्या शय्येवरच आज मिळून जावयाचे आहे, न्हाऊन माखून तयार हो. नीट केस वगैरे विंचर. वेणीफणी कर. एकदा त्या घरी गेल्यावर फिरून नाही येणे होणार. कर सारी तयारी.'
किती सुंदर आहे हे गाणे ! किती सुंदर आहे भाव ! मरण म्हणजे जगाचा वियोग, परंतु जगदीश्वराशी योग ! जिवाशिवाची लग्नघटिका म्हणजे मरण ! आपण मनुष्य मेला म्हणजे त्याला नवे वस्त्र नेसवितो. त्याला अंघोळ घालतो, त्याला सजवितो. जणू ते विवाहमंगल असते ! मरण म्हणजे विवाहमंगल ! मरण म्हणजे विवाहकौतुक !
भारतीय संस्कृतीने मरणाची नांगी काढून टाकली आहे. भारतीय संस्कृतीने मरणाला जीवनाहून सुंदर व मधुर बनविले आहे. 'प्राणो मृत्यु:' -मृत्यू म्हणजे प्राण असा सिध्दान्त स्थापिला आहे. मरण म्हणजे गंमत. मरण म्हणजे मेवा. मरण म्हणजे अंगरखा काढणे. मरण म्हणजे चिरलग्न.
ज्या संस्कृतीने मरणाचे जीवन बनविले, त्या संस्कृतीच्या उपासकांत आज मरणाचा अपरंपार डर भरून राहिला आहे. मरण हा शब्दही त्यांना सहन होत नाही. केवळ शरीराला कुरवाळणारे सारे झाले आहेत. महान ध्येयासाठी ही देहाची मडकी हसत हसत फोडावयास जे निघतील, तेच भारतीय संस्कृतीचे खरे उपासक ! कातडी सांभाळणारे भारतीय संस्कृतीचे पुत्र शोभत नाहीत. भारतातील सर्व प्रकारचे दैन्य-दास्य, सर्व प्रकारचे विषमय वैषम्य, सर्व प्रकारचा अंधार दूर करण्यासाठी देहाची बलिदाने करावयास लाखो कन्या-पुत्र उठतील, त्या वेळेसच भारतीय संस्कृतीचा सुगंध दिगंत जाईल व भारत नवतेजाने फुलेल.