भारतीय संस्कृती 21
“ह्या सात मर्यादा शहाण्या लोकांनी आता आखून दिल्या आहेत. “ह्या सात मर्यादांचे उल्लंघन होणे पाप समजले जाई. त्या काळातील कवी म्हणजे विचारवंत लोक, समाजाची परिस्थिती विशाल व सूक्ष्म दृष्टीने पाहून नवीन मर्यादा, नवीन नवीन नियम घालून देत असत. एका सूक्तात वसिष्ठ ऋषी म्हणतात, “उपैमि चिकितुषे जनाय” –चिकित्सा करणा-या प्रज्ञावंताकडे माझे काय चुकले, ते विचारावयास मी जातो. समाजात असे महात्मे असत. त्यांचा सल्ला घेतला जाई.
नागपूरचे विद्वद्रत्न डॉ. दप्तरी यांनी लिहिले आहे की, त्या त्या युगात सप्तर्षी नवधर्म देत असत. मनू व सप्तर्षी त्या त्या काळातील युगधर्म सांगत. मनू म्हणजे जिज्ञासू जीव म्हणा. जिज्ञासू जीव त्या त्या काळातील पूज्य अशी सात पुरुषांकडे जाई. हे सात पुरुष एकमताने जो धर्म सांगत, तो त्या काळातील धर्म मानला जाई.
उदाहरणार्थ, आजच्या आंदोलनाच्या काळात जर योग्य धर्म पाहिजे असेल, तर आजच्या भारतवर्षातील सात थोर पुरुष एकत्र बसावेत. ते एकमताने ज्या गोष्टी ठरवितील तो आजचा युगधर्म होईल. डॉ. राधाकृष्णन, महात्मा गांधी, डॉ. कुर्तकोटी, पं. मदनमोहन मालवीय, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. आंबेडकर अशी विविध विचारांची मंडळी एकत्र बसवावी. जे काही नियम सर्वानुमते व ठरवितील तो आजचा धर्म, ती आजची स्मृती. अशा प्रकारची आपली प्राचीन काळातील पद्धती होती.
स्मृतिग्रंथांतून नुसते वरवर चाळत गेले तरी शेकडो फरक आपणांस दिसतील. एके काळी मुलांच्या मौजीबंधनाप्रमाणे मुलींचेही मौजीबंधन करण्यात येत असे. ह्याचा अर्थ मुलांप्रमाणे मुलींनीही शिकावे असा त्या वेळचा धर्म होता. प्राचीन काळात वादविवाद करणा-या पंडिता नारी पदोपदी आढळतात. वेदांमध्ये स्त्री ऋषींची सूक्ते आहेत. रामायणात गोदावरीच्या तीरावर संध्या करणा-या सीतेचे वर्णन आहे. स्त्रियांना ज्ञानाचा ज्ञानाचा अधिकार होता. त्या ब्रह्मवादिनी होत्या. सभांतून त्या चर्चा करीत. महाभारताच्या उद्योगपर्वात सत्तर वर्षांचे वय होईपर्यंत ब्रह्मचारिणी व ब्रह्मवादिनी म्हणून वागणारी एक तेजस्वी नारी विवाह करू पाहते, असा उल्लेख आहे.
संस्कृत नाटकांतून ऋषींच्या आश्रमांत विद्यार्थिनी एकत्र शिकत, असे उल्लेख आहेत. शाकुंतलात अनसूया, प्रियंवदा वगैरे शिकण्यासाठीच राहिलेल्या मुली आहेत. उत्तमरामचरितात वाल्मीकीच्या आश्रमात मुलीही शिकत, असे उल्लेख आहेत. एका शाळेतून दुस-या शाळेत जावे, एका आश्रमात अभ्यासाचे नीट न जमले तर दुस-या आश्रमात जावे, असाही प्रकार होता. ज्या वेळेस मुलींचे मौजीबंधन होई व त्या शिकत, त्या वेळेस अर्थातच प्रौढविवाह असतील. परंतु प्रौढविवाह पुढे कदाचित बदलावे असे काही विचारवंतांस वाटले असेल. हिंदुस्थानात एकत्र कुटुंबपद्धती प्राचीन काळापासून आहे. एकत्र कुटुंबपद्धती यशस्वी होण्यासाठी स्त्रियांवर जबाबदारी आहे. प्रौढ मुलींना सासरची सर्व मंडळी आपलीशी वाटत नाहीत. पतीपुरते त्यांचे प्रेम असते. जर मुलींचे विवाह लहानपणीच केले, तर त्या लहानपणीच मधूनमधून सासरी जातील. लहानपणीच प्रेमाचे संबंध जडतात. दीराबद्दल, सासरच्या मंडळींबद्दल आपलेपणा त्या मुलींच्या मनात साहचर्याने व परिचयाने लहानपणी उत्पन्न होण्याचा संभव अधिक. एकत्र कुटुंबपद्धतीचा प्रयोग करणा-यांनी कदाचित यासाठी प्रौढविवाह रद्द करून बालविवाह रूढ केले असतील. किंवा मुले-मुली शिकल्यावर कदाचित भराभर भिक्षु-भिक्षुणींचे संघ व्यभिचारी होतील; अशी भीती वाटल्यामुळे समाजाचे नियम करणा-यांनी बालविवाह रूढ केले असतील.