भारतीय संस्कृती 136
कामकरी-शेतकरी, त्यांना श्रम भरपूर होतात; परंतु पोटभर खायला नसल्यामुळे त्यांची शरीरे कृश होत आहेत. पांढरपेशांना श्रम नाहीत व श्रमजीवी जनतेस अपार श्रम, असा हा देखावा आहे. श्रमजीवी लोकांस विसावा व भरपूर अन्न दिल्याशिवाय त्यांचे आरोग्य सुधारणार नाही. श्रमहीनांस श्रम करावयास लावल्याशिवाय त्यांचे आरोग्य सुधारणार नाही. श्रमहीनांस श्रम करावयास लावल्याशिवाय ते सुदृढ होणार नाहीत.
शरीराला व्यायाम पाहिजे, श्रम पाहिजे, त्याचप्रमाणे भरपूर खायलाही पाहिजे. परंतु काय खावे-प्यावे तेही आपणांस समजेनासे झाले आहे. सकस अन्न आपल्या पोटात जात नाही. ज्ञानाचा दिवा सर्वत्र नेला पाहिजे. कोणत्या भाज्या चांगल्या, कोणते पाले चांगले, कोणत्या डाळी चांगल्या, कच्चे खावे की शिजवलेले खावे, कोरडे खावे की पातळ खावे, मसाले चांगले का वाईट, एक का दोन-शेकडो गोष्टींवर ज्ञानाचा प्रकाश पडावयास हवा.
जीवनसत्त्वाचे नवीन शास्त्र निर्माण झाले आहे. आपण कणीक चाळून घेतो व कोंडा फेकून देतो. शास्त्र सांगते, की हा मूर्खपणा आहे. कोंड्यासकट कणकेची पोळी करा. कोंड्यात सत्त्व आहे. तो प्रकृतीस फार चांगला. आपण गिरणीत सडलेले पांढरेशुभ्र तांदूळ खातो; परंतु शास्त्र सांगते, की हे चूक आहे. न सडलेले तांदूळ खाणे चांगले. असडिक तांदळांत शर्करा असते. सडलेले व बिनसडलेले असे तांदूळ ठेवा. बिनसडलेल्या तांदळांत आधी किडी होतील कारण त्यात शर्करा अधिक आहे. ही शर्करा हाडांना फार चांगली. परंतु ते पांढरे फटफटीत तांदूळ खाऊन आपण पांढरे फटफटीत होत आहोत ! तोंडावरचा तजेला जात आहे. परंतु इकडे कोणी लक्ष द्यावयाचे ?
यंत्राने सडलेले तांदूळ बेरीबेरी रोग होतो. काही देशांत असे तांदूळ खाऊ नयेत म्हणून कायदे झाले आहेत. परंतु आपल्याकडे कोण करणार ? आपले सरकार आहे परकी. ते कशाला काळजी घेईल ? परंतु आपल्या शरीराची आपल्याला नको का काळजी घ्यावयास ? नवीन सुशिक्षित बुध्दीची व स्वतंत्र विचारांची ऐट दाखवीत असतात. परंतु एकीकडे सायन्स जे सांगते, त्याप्रमाणे वागावयासही ते तयार नाहीत. सडलेले तांदूळ व बिनसडलेले तांदूळ निरनिराळ्या उंदरांस खाण्यास देण्यात आले. बिनसडलेले तांदूळ खाणारे उंदीर धष्टपुष्ट झालेले दिसले.
गायीचे दूध नाहीसे होत चालल्याने उंची कमी होत आहे. दुग्धाहाराला आपण फार महत्त्व दिले होते. तसेच ताकासही. मध-पाणी प्यावयाचीही प्रथा होती. पाहुणा आला, की त्याला मध-पाणी देत मध-पाणी नियमित प्याल्याने आयुष्य वाढते. प्रयोगांनी हे सिध्द झाले आहे. मध फार आरोग्यदायक वस्तू आहे. इतिहासाचार्य राजवाडे भातावर मध ओतीत व खात.
फलाहाराचेही फार महत्त्व आपण ओळखले होते. मधून मधून मुद्दाम उपवासांची योजना करून त्या दिवशी तरी फलाहार करावा, अशी योजना पूर्वजांनी केली. परंतु फराळाच्या दिवशीही आपण साबुदाण्याचा चिवडा करतो व खातो ! आपण तेलातिखटाचे, तळलेल्या वस्तूंचे भोक्ते झालो आहोत. चणे चटपटे, चिवडा मसालेदार यांची धातुक चटक आपणांस लागत आहे. एक आण्याचा चिवडा खाण्याऐवजी एक आण्याची केळी घेऊन खाल्ली, तर शरीराला कितीतरी फायदा होईल ! परंतु विचाराचा डोळा आज फुटलेला आहे. अंधळे आचरण चालले आहे.