भारतीय संस्कृती 160
निरनिराळे महाराज व त्यांचे भक्तगण अंगावर मुद्रा ठोकतात. कपाळावर, छातीवर, दंडावर, सर्वत्र मुद्रा लावतात. त्यातील हाच अर्थ आहे. हे कपाळ देवाचे, हे हात देवाचे, हे हृदय देवाचे. सर्व अवयवांवर देवाचा शिक्का. देवाच्या सेवेत, जनताजनार्दनाच्या सेवेत, अवघाची संसार सुखाचा करण्याच्या महान कर्मात, ही गात्रे चंदनाप्रमाणे झिजतील, अशी प्रतिज्ञा मुद्रा मारण्यात आहे.
आपण यज्ञोपवीत घालतो. पूर्वीचा त्यातील अर्थ काहीही असो, मला एके दिवशी त्या तीनपदरी जानव्यात केवढा थोरला अर्थ सापडला. कर्म, ज्ञान, भक्ती यांचे तीन पदर म्हणजे हे जानवे. या तिन्हींची एकत्र बांधलेली गाठ म्हणजे ब्रह्मगाठ. कर्म, ज्ञान व भक्ती जेव्हा आपण एकमेकांत मिसळू तेव्हाच ब्रह्माची गाठ पडेल ! केवळ कर्माने, केवळ भक्तीने, केवळ ज्ञानाने ब्रह्मगाठ पडणार नाही. फुलांची पाकळी, तिचा रंग, तिचा गंध यांत अविनाभाव असतो. दूध, साखर व केशर ज्याप्रमाणे आपण एकजीव करतो, त्याप्रमाणे कर्म-ज्ञान-भक्तीचा एकजीव केला पाहिजे.
आपण देवाला न हुंगलेले फूल वाहतो. वास घेतलेले, वासलेले फूल वाहत नाही. ते फूल म्हणजे काय ? ते फूल आपल्या हृदयाचे प्रतीक आहे. त्या फुलाच्या रूपाने आपण आपले हृदयपुष्पच देवाला वाहात असतो. वासनांनी वास न घेतलेले असे हृदय देवाला वाहा. ज्या हृदयाचा दुसरा कोणीही वास घेतलेला नाही. ज्या हृदयाचा दुसरा कोणी स्वामी नाही, दुसरा कोणी भोक्ता नाही, असे हृदय देवाला अर्पण करा. भक्ती अव्यभिचारिणी असते. -Love is jealous. प्रेमाला दुसरे सहन होत नाही. एकालाच हृदय दे. देवाला द्यावयाचे असेल, देवाला दे. जेथे देशील तेथे ते संपूर्णपणे दे. ताजे, रसाने भरलेले, निर्दोष, पूर्णपणे फुललेले, सुगंधी असे तुझे हृदयपुष्प सेवेच्या कर्मात अर्पण कर.
देवाला नैवेद्य दाखवितो म्हणजे काय करतो ? कोणता नैवेद्य देवाला प्रिय आहे ? आपल्या सर्व क्रिया म्हणजे नैवेद्य. ते लहानशा वाटीभर निर्मळ दूध म्हणजे तुझ्या स्वच्छ सुंदर क्रिया होत. देवाला कर्माचा नैवेद्य अर्पण करावयाचा. जे केले ते देवाला अर्पण करावयाचे. 'ओम तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु' हा प्रत्येक कर्माचा अंतिम मंत्र आहे.
माझ्या मनात ज्या दिवशी ही कल्पना आली, त्या दिवशी देवाची मला करुणा आली. देव अनंत जन्मीचा उपाशी असेल असे मनात आले. घरात वृध्द पवित्र माता असावी, ती इतर काही पदार्थ खात नसते; परंतु तिच्या मुलांनी तिला कांद्याची भजी, लसणाची चटणी, किंवा असेच पदार्थ नेऊन दिले, तर ती व्रतचारिणी माता काय म्हणेल ? 'बाळांनो ! माझी थट्टा नका करू. या पदार्थांना मी शिवते का ? द्यायचे असेल तर नीट द्या, नाही तर काहीही देऊ नका; परंतु घाण नका आणू माझ्यासमोर.' असे ती माउली म्हणेल. देवही असेच म्हणत असेल. आपण मानव आज हजारो वर्षे ज्या अनंत क्रिया अंतर्बाह्य करीत आहोत, त्या सर्व देवाच्या जवळ पडत आहेत. त्या क्रियांचा नैवेद्य त्याला मिळत आहे. परंतु तो नैवेद्या त्याला खाववेल का ? त्यातील एक तरी घास त्याला गिळवेल का ? नैवेद्य दाखविणा-या प्रत्येकाने हा विचार मनात आणावा.
देवावर आपण अभिषेक करतो. म्हणजे संतत धार. घागरभर पाणी एकदम ओतणे म्हणजे अभिषेक नव्हे. अभिषेक हे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे ती पाण्याची धार सारखी अखंड देवावर पडत आहे, त्याप्रमाणे सारखी मनाची धार देवाच्या चरणी पडणे, परमेश्वराच्या स्वरूपी मनोबुध्दी पूर्णपणे तैलधारवत् जडणे, हा त्यातील अर्थ आहे. तो जलाभिषेक म्हणजे तुझ्या जाणिवेचा अभिषेक आहे.
आपण दक्षिणा ओली करून देतो. समाजाला जी जी देणगी देशील, जे जे दान देशील, त्यात हृदयाचा ओलावा असू दे. जे कर्म हृदयाचा ओलावा ओतून केलेले आहे ते अमोल आहे. तुझ्या सर्व क्रिया आर्द्र असू देत. कोरडी सहानुभूती नको. देखल्या देवा दंडवत नको. कष्टाचा रामराम नको.