भारतीय संस्कृती 98
''मी आकाश आहे, तू पृथ्वी आहेस. मी सामवेद आहे, तू ऋग्वेद आहेस. आपण एकमेकांवर प्रेम करू. एकमेकांस शोभवू, एकमेकांस आवडती होऊ. एकमेकांशी निष्कपटपणे वागून शतायुषी होऊ. ''
सप्तपदी वगैरे झाल्यावर जेव्हा गृहप्रवेश होत असतो, त्या वेळेस वर म्हणतो:
''हे वधू, तू सासू-सास-यांवर, नणंदा-दिरांवर प्रेमाची सत्ता चालविणारी हो. ''
''सर्व देव आमची हृदये मोकळी करोत. उदके आमची मने निर्मळ करोत. मातरिश्वा, विधाता व सरस्वती आमची जीवने परस्परांशी जोडोत. ''
''हे वधू! तू या कुळात येत आहेस. येथे संततियुक्त होऊन तुला आनंद मिळो. या घरात ख-या गृहिणीची कर्तव्ये तू दक्षतेने पार पाड. ह्या पतिसहवर्तमान आनंदाने राहा. तुम्ही या घरात बहुत काळ राहून सुखी झालात असे लोक म्हणू देत. ''
''चाळणीने धान्य शुध्द करून घेतात, त्याप्रमाणे या घरात शुध्द संयमपूर्वक वाणीचा उपयोग केला जातो. म्हणून थोरामोठ्यांची या घराशी मैत्री जुळते. अशा गोड भाषा बोलणा-यांच्या जिभेवर लक्ष्मी वास करते. ''
विवाहसूक्तात वधूला अघोरचक्षू व शिवा, सुमना व तेजस्वी, वीरप्रसू व श्रध्दाळू अशी विशेषणे लाविलेली आहेत. अघोरचक्षू हे विशेषण वधू व वर दोघांनी ध्यानात धरण्यासारखें आहे. एकमेकांची दृष्टी प्रेमळ असू दे; भयावह, क्रूर नसू दे. लग्न म्हणजे केवळ बाह्य लग्न नाही. हृदयाचे लग्न. मनाचे लग्न. वधूने वरास माळ घालणे, वराने वधूस माळ घालणे म्हणजे एकमेकांची निर्मळ हृदयपुष्पे एकमेकांस वाहणे हाच त्याचा अर्थ. अग्नीभोवती सात पावले चालणे म्हणजे जन्मोजन्मी बरोबर चालणे, सहकार करणे. पतिपत्नी सुखात वा दु:खात सदैव बरोबर असतील, बरोबर चढतील, बरोबर पडतील. त्याच्याभोवती सूत गुंडाळले जात असते. पतिपत्नींचा जीवनपट आता एकत्र विणला जाणार. ताणा व बाणा एकत्र होणार. आता पृथक् काही नाही, अलग काही नाही.
देहावर प्रेम असल्याने खरे प्रेम जडत नाही. देह उद्या रोगाने कुरूप झाला तर? आपण प्रारंभ देहापासून करू. परंतु देहातील होऊ. देहाच्या आत असलेला आत्मा ओळखून त्याची गाठ घेतली पाहिजे. मनुष्य अंगणातून ओसरीवर येतो, माजघरात येतो, मग देवघरात जातो. तसे वधूवरांनी शेवटी परस्परांच्या हृदयांतील देवघरांत शिरले पाहिजे. माझ्या फक्त देहाची पूजा करणारा पती माझा अपमान करतो असे वाटले पाहिजे. हा मातीचा गाळा म्हणजे काही आपण नाही. पतिपत्नींनी परस्परांस मातीचे गोळे, मांसाचे गोळे समजू नये. हळूहळू या मातीच्या आत जी उदात्तता आहे, जी वर जाण्याची शक्ती आहे, तिच्यावर परस्परांनी ध्यान दिले पाहिजे. पतीला पाहताच पतीतील दिव्यता पत्नीस दिसावी. पत्नीस पाहताच पतीला ती देवता वाटावी. भोग भोगता भोगता एक दिवस विरक्त व्हावयाचे. देहाच्या आत शिरुन आत्मा आत्म्याशी जोडावयाचा.