भारतीय संस्कृती 120
अहिंसा
‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारतीय हवा म्हणजे अहिंसेचा हवा. भारतात जो श्वोसोच्छवास करू लागेल, त्याच्या जीवनात हळूहळू हे अहिंसा तत्त्व शिरल्याशिवाय राहणार नाही.
परंतु या ‘अहिंसा परमो धर्मः’ तत्त्वाची महती भारतास एकाएकी कळली असे नाही. फार मोठी तपश्चर्या या तत्त्वाच्या पाठीमागे आहे. मोठमोठे प्रयोग या गोष्टीसाठी झाले. वेदकाळापासून तो आजपर्यंत भारतीय संस्कृतीतील सोनेरी सूत्र म्हणजे अहिंसा हे होय. या सूत्राभोवती भारतातील धार्मिक, राजकीय, सामाजिक चळवळी गुंफिलेल्या आहेत. भारतवर्षाचा इतिहास म्हणजे एक प्रकारे अहिंसेच्या प्रयोगाचा इतिहास.
मनुष्यप्राणी हळूहळू उत्क्रान्त होत आला आहे. मुंगीच्या पावलाने मानवजातीची प्रगती होत असते. भारतातील अहिंसेचा इतिहास पाहावयास लागू तर ही प्रगती कशी आस्ते आस्ते होत आली, ते आपणांस दिसून येईल.
अहिंसा या शब्दाचा अर्थ आज कितीतरी व्यापक झाला आहे. शब्दाने कोणाचे मन दुखविणे हीही हिंसा आज आपण मानतो. विचाराने, आचाराने, उच्चाराने कोणाचेही अकल्याण न चिंतणे, हा आजच्या अहिंसेचा अर्थ आहे.
प्राचीन काळापासून मुख्यतः दोन गोष्टींसाठी हिंसा होत आली आहेः भक्षणासाठी व रक्षणासाठी. मनुष्य खाण्यासाठी हिंसा करतो व स्वतःचे संरक्षण व्हावे म्हणून हिंसा करतो. तिसरेही एक कारण हिंसेसाठी असे, ते म्हणजे यज्ञ. परंतु या यज्ञीय हिंसेचाही भक्षणातच अंतर्भाव होतो. कारण मनुष्य जे खातो तेच देवाला देतो. यज्ञ म्हणजे देवांना आहुती देणे, हा मूळ अर्थ होता. आपल्यासाठी ऊन, पाऊस, फुले-फळे सर्व काही देणारे जे देव, त्यांना आपणहू काही दिले पाहिजे, यातून यज्ञकल्पना निघाली. मग देवांना काय द्यावयाचे हा प्रश्न उत्पन्न झाला. साहजिकच जे आपल्याला आवडते ते देवाला द्यावे असे ठरले. आपल्याला मांस आवडते, तर देवालाही तेच द्या, असा धर्म झाला. म्हणून यज्ञीय हिंसा हीसुद्धा मनुष्याच्या भक्षणातून निर्माण झाली असावी असे वाटते.
अत्यंत प्राचीन काळी माणूस माणसासही खात असे. माणसांचे मांस सर्वांना चांगले असे त्यास वाटत असे. ज्या वेळेस माणूस माणसास खाई, त्या वेळेस देवासही माणसाचाच बळी देण्याची चाल असेल, यात शंका नाही. राजेंद्रलालसारख्या पंडितांनी भारतवर्षात प्राचीन काळी नरमेधही होता असे लिहिले आहे.
परंतु विचारवंत मनुष्य विचार करू लागला. त्याला लाज वाटू लागली. आपल्यासारखीच सुखदुःखे असणारा हा जो मनुष्य, त्याला आपण कसे मारावे, कसे भाजून खावे, असा त्यांच्या मनात विचार आला आणि नरमांस खाण्याचे काही विचारी माणसांनी बंद केले. परंतु समाजातील सवयी एकदम जात नसतात. कोणीही नवीन विचार समाजाला दिला तर त्याचा छळ होतो. त्याची टर उडविण्यात येते. प्राचीन काळीही असेच झाले असेल.