भारतीय संस्कृती 106
पती कसाही असो, त्याला पत्नी सांभाळून घेते. कुटुंबाची अब्रू ती संरक्षिते. कुटुंबाची लाज ती उघडी पडू देणार नाही. स्वत: उपाशी राहील, दळणकांडण करील, परंतु कुटुंब चालवील. तेवढ्यातल्या तेवढ्यात मुलाबाळांचे करील. खाऊ द्यावयास नसेल तर मुके घेईल व त्यांना हसवील! स्वत:चे अश्रू, स्वत:चे दु:ख ती कोणास दाखविणार नाही! तिचे दु:ख केवळ तिलाच माहीत असते!
पतीची लहर सांभळणे म्हणजे तिचा धर्म होऊन बसतो! रात्री आठ वाजता येतात का दहा वाजता येतात, ती बिचारी वाट पाहात असते. पती उशिरा आल्यावर म्हणतो, “तू जेवून का नाही घेतलेस?” तो जर पत्नीच्या हृदयात कधी डोकावता, तर असे शब्द त्याने कधी काढले नसते.
पतिमुखावरचे हास्य म्हणजे पत्नीचे सुखसर्वस्व! ती पतीच्या मुद्रेकडे पाहात असते. पतीचे डोळे हसले, ओठ हसले तिला मोक्ष मिळतो. पती गोड बोलला की तिला सारे मिळाले! किती अल्पसंतोषी भारतीय सती! परंतु हा अल्पसंतोषही त्यांना मिळत नसतो.
पापी, दुर्गुणी, दुराचारी पतींचीही सेवा भारतीय स्त्रिया करीत असतात. एकदा ज्यांच्याशी गाठ पडली ती कशी सोडावयाची! जरी काही जातींत काडीमोड होत असली, तरी काडीमोड हे संस्कृतीचे चिन्ह समजले जात नाही. जरी काही जातींत पुनर्विवाह लागत असला, तरी पुनर्विवाह हे सांस्कृतिक लक्षण गणले जात नाही. पती म्हणजे त्यांचा देव. त्यांचा महान आदर्श! त्यांचे दिव्य ध्येय!
पती दुर्वत्त असला तरी त्याल थोडेच टाकावयाचे? एकदा त्याला मी माझा असे म्हटले. आपलेपणाचे नाते परीस आहे. माझा मुलगा खोडकर असला म्हणून का त्याला मी टाकीन? सारे जग माझ्या मुलाला नावे ठेवील, म्हणून मीही ठेवावी? मग त्याच्यावर मायेचे पांघरूण कोणी घालावयाचे? कोणाच्या तोंडाकडे त्याने बघावे. कोणाकडे जावे? जसे मूल. तसाच पती. सा-या जगाने माझ्या पतीची छी:थू केली. त्याला हिडीसफिडीस केले तरी मी नाही करता कामा. मीही त्याला दु:ख दिले, मीही त्याला प्रेमाचा शब्द दिला नाही, प्रेमाने जेवू घातले नाही, तर मग हे घर तरी कशाला? सारे जग लोटील, परंतु घर लोटणार नाही. घर म्हणजे आधार, घर म्हणजे आशा, घर म्हणजे विसावा, घर म्हणजे प्रेम, घर म्हणजे आत्मीयता! हे घर माझ्या पतीसाठी व मुलांसाठी मी प्रेमाने भरून ठेवीन.
अशी ही भारतीय स्त्रियांची दृष्टी आहे. पती वाईट आहे, पतीशी माझे पटत नाही म्हणून भराभर जर घटस्फोट होऊ लागले, तर काय साधणार आहे? मग जग म्हणजे सहकार्य. जग म्हणजे तडजोड. संसार म्हणजे देवाण-घेवाण. परंतु पती जर सहकार्य करत नसेल, तर मी का त्याला सोडून जाऊ? त्यागमय प्रेमाने मी त्याच्याशीच राहीन. माझ्या प्रेमाचे त्यातच बळ आहे. दुर्गुणालाही सांभाळील तेच प्रेम. मी आशेने सेवा करीन, प्रेम देईन. मनुष्य हा शेवटी किती झाले तरी ईश्वरी अंश आहे. एक दिवस माझ्या पतीतील दिव्यता प्रकट होईल. त्याच्या आत्मचंद्राला ग्रहण लागले म्हणून का मी त्याला सोडू? उलट. त्याच्याबद्दल मला अनुकंपा वाटली पाहिजे. मला वाईट वाटले पाहिजे. सारे जग त्याला हसत आहे. मीही का हसू? नाही, नाही. माझ्या प्राणांनी मी त्याला सांभाळीन. त्याला सांभाळता सांभाळता कदाचित मला माझे बलिदानही द्यावे लागेल. काही हरकत नाही. ते बलिदान व्यर्थ जाणार नाही. माझ्या जीवनाने जे झाले नाही, ते मरणाने होईल. सिंधूच्या मरणाने सुधाकरचे डोळे उघडतील. सिंधूचे मरण फुकट नाही गेले.