भारतीय संस्कृती 51
आज विमानांतून बाँबगोळे फेकून जीवने धुळीत मिळविली जात आहेत. आज विषारी गॅस सोडून लोक मारण्यात येत आहेत. प्रचंड यंत्रांचे शोध करून मजुरांना पिळून काढण्यात येत आहे. विज्ञानाचा अशा रीतीने दुरुपयोग होत आहे. बुद्धीचा आग लावण्याकडे उपयोग होत आहे.
अद्वैताची दृष्टी आल्याशिवाय, आत्मौपम्य आल्याशिवाय विज्ञान फुकट आहे. ज्ञानहीन विज्ञानाच्या हातात समाज सोपविणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्याप्रमाणेच आहे. म्हणून आधी सारे भाऊ भाऊ व्हा. सारे एका ईश्वराचे व्हा. कोणी आर्य नाही, कोणी अनार्य नाही ; कोणी हिंदू नाही, कोणी मुसलमान नाही ; सारे मानव आहोत. या मानवांची निरपवाद पूजा विज्ञानमय कर्माने करावयाची आहे.
जर्मनीतून ज्यू लोकांची हकालपट्टी हिटलरने केली. आर्य लोकांशी ज्यूंचा संबंध नको, आर्य म्हणजे श्रेष्ठ, असला आचरटपणा व रानवटपणा तो हिटलर करीत आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की, काही हिंदुसंघटनवाले हिटलरचा हा कित्ता गिरवण्यास हिंदूंस सांगत आहेत ! “पाहा तो हडेलहप्पी हिटलर. कसा तो ज्यूंचा हकालपट्टी करीत आहे. तुम्हीही तशीच मुसलमानांची करा.” असले तत्त्वज्ञान सांगण्यात येत आहे. ही भारतीय संस्कृती नाही. भारतीय संस्कृती सर्व जगातील मानवांना हक्क मारील. भारतात ‘शृण्वन्तु सर्वे अमृतस्य पुत्रा:’-
‘अमृतस्वरूपी देवाच्या लेकरांनो, ऐका’ अशी ऋषी गर्जना करील. भारतीय संस्कृती हे करीत आली, हेच पुढे करील. आर्य असोत, अनार्य असोत ; कृष्ण असोत, पीत असोत, रक्त असोत ; बसक्या नाकाचे असतो, जाड ओठांचे असोत, रुंद जबड्याचे असोत वा घा-या डोळ्यांचे असोत, ठेंगणे वा उंच असोत ; सारे मानव स्वतःच्या दिव्य झेंड्याखाली घेण्यासाठी भारतीय संस्कृती उभी आहे.
तात्पुरत्या विजयाने हुरळून हिटलरी अनुकरणे करून पशू होणे योग्य नव्हे. आपला थोर वारसा आहे. आपण दिव्य मानव्यासाठी जगू या व मरू या. प्रत्येक मानवजातीत थोर पुरुष उत्पन्न झालेले आहेत. मानवजातीस ज्यांचा चिरंतन अभिमान वाटावा, अशी नरनारीरत्ने सर्व मानववंशांत जन्मली आहेत. कोणी कोणास हसण्याची जरूरी नाही.
ही मानवी ऐक्याची भव्य कल्पना भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. कोणतेही कर्म करताना ही दृष्टी हवी. भक्ती म्हणजे हे अद्वैत ज्ञानच. दुस-याबद्दल तेव्हाच प्रेम व भक्ती वाटेल, -ज्या वेळेस तो माझ्यासारखाच आहे, एकच सत्तत्व सर्वांत आहे असे समजेल तेव्हा ! तो म्हणजे मीच आहे, आणि म्हणूनच त्याच्यावर मी प्रेम केले पाहिजे. मी दुस-यावर प्रेम करतो, म्हणजे स्वतःवरच प्रेम करतो.
कर्मामध्ये हे आत्मौपम्य आले म्हणजे कर्म मनापासून होईल. परंतु ते कर्म हितकर व्हावे म्हणून त्यात विज्ञानही हवे. विज्ञान म्हणजे ते ते कर्म कसे करावयाचे याची माहिती. केवळ प्रेम असून भागत नाही. समजा, एखाद्या रोग्याची मी शुश्रूषा करीत आहे. त्या रोग्याबद्दल मला प्रेम आहे. त्याच्याबद्दल मला आपलेपणा आहे. परंतु त्याची शुश्रूषा कशी करावयाची ह्याविषयीचे नीट ज्ञान जर मला नसेल, तर नुकसान होण्याचा संभव असतो. प्रेमामुळे, जे देऊ नये तेच मी खावयास देईन ; जे करावयास नको तेच करीन ; जे पाजावयास नको तेच पाजीन. अशा रीतीने माझे प्रेम तारक होण्याऐवजी मारकच व्हावयाचे.