भारतीय संस्कृती 47
एका जपानी कामगाराला कोणी विचारले, “तू चांगले स्क्रू करतोस का ?” त्या कामगाराने उत्तर दिले, “नुसते चांगलेच नाही, तर उत्कृष्ट स्क्रू मी तयार करतो.” हेच उत्तर आपणा सर्वांस देता आले पाहिजे. मी जे जे कर्म करतो ते उत्कृष्ट, असे ज्याला म्हणता येईल तो धन्य होय.
एक जपानी मजूर गलबते बांधण्याच्या कामावर असे. तो वाचावयास शिकत होता. कोणी त्याला विचारले, “तू आता मोठा झालास, कशाला वाचावयास शिकतोस ?” तो म्हणाला, “समजा, रशियाशी आमच्या देशाची लढाई सुरू झाली. त्या लढाईत आरमारी युद्धेही होतील. एखाद्या आरमारी युद्धात जपानी आरमाराचा जर विजय झाला, आणि तो विजय मिळवून देणा-या गलबतांत जर हे गलबत असेल तर मला किती आनंद होईल ! ज्या गलबतांना मी तयार करीत होतो, त्या गलबतांची नावे जर मी वर्तमानपत्रात वाचली तर मला कृतकृत्य वाटेल. मी म्हणेन की त्या गलबतात मी दोन खिळे मारले होते, मी दोन पत्रे ठोकले होते, मी दोन स्क्रू पिळले होते. मीही माझ्या देशाच्या युद्धात-माझ्या देशाच्या विजयात थोडा भागीदार आहे, असे मला वाटते. ते वर्तमानपत्र वाचता यावे म्हणून मी शिकत आहे.”
आपल्या लहानशा कर्माबद्दल केवढी ही थोर दृष्टी ! माझे हे लहानसे कर्मही देशाच्या उपयोगी पडेल, समाजाच्या उपयोगास येईल, म्हणून ते मी करीत आहे ; व शक्य तितके उत्कृष्ट करीत आहे असे मनात वागवणे यात केवढा कर्ममहिमा आहे !
कर्म लहान असो वा मोठे असो. ते कर्म समाजाला मोक्ष देणारे करा, समाजाच्या उपयोगास येईल असे करा. समाजाच्या पूजेच्या कामी ते येईल, असे करा. लेख वा व्याख्याने द्या. उच्चारलेला शब्द, लिहिलेली ओळ समाजाचे भले करील अशी मनात खात्री असू दे. मी दिलेला माल समाजाला पुष्टी देईल, रोग देणार नाही, ही सर्वांची अंतरी निष्ठा असू दे. बौद्धिक खाणी द्या वा शारीरिक खाणी द्या. ती समाजाला धष्टपुष्ट करतील अशी असू देत. विषारी खाणी कृपा करून समाजाला देऊ नका.
अशा दिव्य कर्ममय जीवनाचा सर्वांस ध्यास लागू दे. “मोक्षाचे तो आम्हां नाही अवघड.” मोक्ष दारात आहे, शेतात आहे, कचेरीत आहे, चुलीजवळ आहे, कारखान्यात आहे, शाळेत आहे, सर्वत्र आहे. समाजाचा बुडालेला धंदा पुन्हा सजीव करून समाजाला भाकरी देऊ पाहणारा महापुरुष हा खरोखर संत आहे. समाजातील घाण दूर करून त्यांना स्वच्छतेत राहावयास शिकविणारा तो परम थोर ऋषी आहे. परपुष्ट कर्मशून्य जीव आता तुच्छ वाटू देत. केवळ हरी हरी म्हणणारे व भोगासाठी लालचावलेले जीव हे किडे वाटू देत.
पोटापुरतें काम। आणि अगत्य तो राम।।
पोटासाठी कोणते तरी कर्म करा ; परंतु ते करताना रामाला विसरू नका. दारूचे गुत्ते घालून पोटाला मिळवू नका. रामाला स्मरणे म्हणजे मंगलाला स्मरणे. समाजाच्या कल्याणाला स्मरणे.