भारतीय संस्कृती 112
मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध
मनुष्याच्या नीतीशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, मानवेतर सृष्टीशीही जर जिव्हाळ्याचे संबंध जोडील, तरच तो सृष्टीत श्रेष्ठ असे सिद्ध होईल. आपण सर्व सृष्टीचा संहार करतो म्हणून मोठे, असे म्हणवून घेण्यापेक्षा सर्व सृष्टीवर आपण प्रेम करतो म्हणून मोठे, असे म्हणवून घेण्यात मानवाचा खरा मोठेपणा आहे.
पशू, पक्षी, वृक्ष, वनस्पती यांच्याशी असे जिव्हाळ्याचे संबंध जोडण्याचा भारतीय संस्कृतीने प्रयत्न केला आहे. मानवी कुटुंबात त्यांना प्रेमाचे स्थान दिले आहे. मानवी शक्ती मर्यादित आहे; परंतु त्या मर्यादित शक्तीचे जे काही करता येईल ते मानवाने करावे असे भारतीय संस्कृती सांगते. आपण सर्व पशूंचा सांभाळ करू शकणार नाही. सर्व पशूंशी प्रेमाने वागू शकणार नाही. परंतु निदान गायी-बैलांशी तरी प्रेम जोडू या. सर्व पशूसृष्टी दूर राहिली; परंतु गायीच्या निमित्ताने पशूसृष्टीशी जोडले जाऊ या. गाय हा पशूसृष्टीचा एक प्रतिनिधी.
भारतीय संस्कृतीत गाय केवळ उपयुक्त वस्तू म्हणून राहिली नाही. गाय सर्वतोपरी उपयोगी म्हणून मानवाने जवळ केले ही गोष्ट खरी; परंतु गाय एकदा अंगणात आल्यावर ती कुटुंबातील एक वस्तू झाली. आपण आपले आईबाप म्हातारे झाले म्हणजे का त्यांना खाटकास विकायचे? त्यांना मारून त्यांचे का खत करावयाचे? हे निरूपयोगी, दुबळे मायबाप ठेवण्यात काय अर्थ, असे का म्हणावयाचे?
आईबाप म्हातारे झाले तरी त्यांना आपण मारीत ना. त्यांचे पूर्वीचे उपकार स्मरतो. त्यांचा देह रात्रंदिवस आपणासाठी झिजला हे आठवतो. त्यांचे प्रेम, त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट, त्यांचे अपार श्रम-सारे आपल्या डोळ्यांसमोर असते. आपण त्या वृद्ध मायबापांना म्हणतो, “आता तुम्ही स्वस्थ बसा. बसून खाण्याची तुमची योग्यता आहे. तुमचे आम्हांस ओझे नाही. तुमच्या अनंत सेवेबद्दल आम्ही कितीही दिले तरी ते थोडेच होईल. तुमचा आशीर्वाद द्या. कृतज्ञतापूर्वक तुमची आता आम्ही सेवा करू.”
गायी-बैल म्हातारे झाले तर त्यांची खाटकाकडे रवानगी करा, असे भारतीय संस्कृती सांगत नाही. ज्या गायीने दहा-दहा पंधरा-पंधरा वर्षे भरपूर दूध दिले, जिच्या दुधावरच आपले सर्वांचे पोषण झाले, जिने शेतीसाठी व इतर कामांसाठी आपणांस खंदे बैल दिले, अशा गायीस ती केवळ आता म्हातारी झाली म्हणून का सोडावयाचे? ती कृतघ्नता आहे. मनुष्य केवळ उपयुक्ततेवर जगू शकत नाही. मनुष्याला काही थोर भावना आहेत. त्या भावनांमुळे मानवाला किंमत आहे. या सर्व थोर भावना उपयुक्ततावादाच्या हत्याराने जर मारून टाकीत असाल, तर माणसाची किंमत शून्य होईल, हे ध्यानात धरले पाहिजे.
गायीचे जर नीट संवर्धन झाले तर दहा-पंधरा वर्षात त्या आपणांस इतके दुग्धरूप द्रव्य देतील, की त्या द्रव्याच्या व्याजातही त्यांच्या म्हातारपणी त्यांचा सांभाळ आपण करू शकू. आजकाल बोंडलेभर दूध देणा-या गायी या गोपूजक भारतात दिसत आहे! अकबराच्या कारकीर्दीत तीस तीस शेर दूध देणा-या गायी होत्या, असे ‘ऐने अकबरी’त उल्लेख आहेत. आजही युरोप-अमेरिकेत अशा गायी गावोगाव आहेत. हिंदुस्थानात सरकारी गोवर्धन गृहात अशा गायी दिसतात. नवीन शास्त्रीय ज्ञानाची कास धरून आपण गोसंगोपन व गोसंवर्धन केले पाहिजे. असे करू तर पुन्हा चार सागरांप्रमाणे ज्यांचे चार सड दुधाने भरलेले आहेत, अशा गायी भारतात दिसू लागतील. पुन्हा ठायी ठायी गोकुळे होतील. आणि मग गाय पोसायला जड वाटणार नाही. ती वृद्ध झाल्यावरही तिला आपण कृतज्ञतेने व प्रेमाने खायला-प्यायला देऊ.