भारतीय संस्कृती 140
हे तेहतीस कोटी देव कोणते ? रावणांकडे हे देव झाडीत होते; पाणी भरीत होते. सारी श्रमकर्मे करीत होते. साम्राज्य स्थापन करणारे सर्व दुनियेला दास करतात, तिला केवळ हमाल बनवितात. देवाप्रमाणे शोभणारी माणसे दास होतात. रामाला मानवाचा मोठेपणा सिध्द करावयाचा होता. देवांचे दास करणे हे त्याचे काम नव्हते. प्रत्येक मनुष्यात दिव्यता आहे. प्रत्येकजण देव आहे. परंतु त्याच्यातील दिव्यता प्रकट व्हावयास अवसर नसतो. सत्तावान त्याला मजूर व पाणक्या करून ठेवतो. तेहतीस कोटी देव म्हणजे कोट्यवधी माणसे हाच अर्थ आहे. या माणसांस मुक्त करणे हे प्रभू रामाचे काम होते.
मारुतीने आपली सारी संघटना. रामाच्या ध्येयार्थ अर्पण केली. स्वत:चे सारे बळ रामाला दिले. साम्राज्यशाही दूर करणारा राम दिसताच मारुती उठला. त्याच्याबरोबर अठरा पद्म वानर उठले. आपल्या बांधवांस स्वातंत्र्य व स्वराज्य देण्यासाठी त्यांचे सर्व बळ होते.
भारतीय संस्कृती ही वस्तू आपणांस सांगत आहे- शरीर, हृदय व बुध्दी यांचे बळ मिळवा, संघटना करा, संघ स्थापा, वातावरण तेजस्वी करा, आणि ही सर्व संघटना महान ध्येयासाठी उपयोगात आणा. राम आर्य व अनार्य पाहात नाही. तुडवले जाणारे जे जीव त्यांना राम बघतो. त्यांचा कैपक्ष घेतो. आणि जे तुडवणारे हिंदू असोत, मुसलमान असोत, इंग्रज असोत, जपानी असोत. राम दोनच वर्ग ओळखतो. पददलित व मदोध्दत. तो पददलितांची बाजू घेऊन उठेल.
भारतीय संस्कृती आर्य व अनार्य हे शब्द वंशवाचक समजत नाही. आर्य म्हणजे उदार, आर्य म्हणजे श्रेष्ठ. आर्य म्हणजे विशाल दृष्टीने पाहणारा, अनासक्त, विमोह. अर्जुन केवळ आपले नातलग पाहून धनुष्यबाण टाकतो. या कर्माला श्रीकृष्ण 'अनार्यजुष्ट' म्हणतात. अन्याय करणारा कोणीही असो. त्याला दंड देणे हे आर्याचे काम. हा आपला म्हणून त्याचे दोष झाकणे अनार्यांचे म्हणजेच मोहग्रस्तांचे, मूढांचे, आसक्तिमयांचे काम आहे.
'कृण्वन्तो विश्वसार्यम्'- याचा अर्थ सर्वांना हिंदू करावयाचे व सर्वांना शेंड्याजानवी द्यावयाची असा नाही. सर्व जगाला आपण उदार करू, सर्व विश्वाला माणुसकी ओळखावयाला शिकवू. सर्वजण खरीखुरी माणसे होऊ, असा त्याचा अर्थ आहे.
स्वत: उदार झाल्याशिवाय जगाला उदार करता येत नाही. स्वत: मोहरहित झाल्याशिवाय, आपापल्या डबक्यात राहणे सोडल्याशिवाय आर्य होता येत नाही. आमच्या संस्कृतीत मानवाचा महिमा आहे, डबक्यांचा महिमा नाही. फार तर सत् व असत् ही दोन डबकी आम्ही मानली आहेत. हे दोन भेद आहेत. जगात सदसतांचा लढा आहे. हिंदु-मुसलमानांचा नाही. हिंदू हा भारतीय संस्कृतीचा शब्द नाही. भारताबाहेरच्या लोकांनी आम्हांस हिंदू करून डबक्यात, एका खोलीत बसविले आणि आम्हीही त्या डबक्यात आनंद मानू लागलो !
जी संघटना जे जे असत् आहे त्याच्याविरुध्द लढावयास उठेल, ती भारतीय संस्कृतीची संघटना आहे, ती गीताप्रणीत आर्यजुष्ट संघटना आहे. अशी संघटना आज या भारतवर्षात राष्ट्रीय सभा निर्माण करीत आहे. भारतीय संस्कृतीचा आत्मा राष्ट्रीय सभा ओळखते. राष्ट्रीय सभा सर्व पददलितांसाठी झुंजावयास तयार आहे.
"नाठाळाच्या काठी हाणूं माथा'
जो जो नाठाळ असेल, त्याच्यावर तिचा प्रहार आहे. जिना, शौकतअल्ली, यांच्यावरही तितक्याच तेजस्वितेने त्यागमूर्ती जवाहरलाल कोरडे उडवितात,- जितक्या प्रखरतेने ते संकुचित डबकेवाल्या हिंदूंवर उडवतात. जे जे गरिबांची पायमल्ली करतील, भ्रामक व खोटे भेदाभेद आणि स्वार्थी, क्षुद्र धर्म यांच्या बळावर जगात हैदोस घालीत असतील, त्या सर्वांवर नरवर जवाहरलाल घसरतील. ख-या सज्जनाचे ते कैपक्षी आहेत. जे जे असत् आहे, त्याच्याशी त्यांचा विरोध आहे. मग त्या असताच्या बाजूस माझे जातभाई असले तरीही. माझी गीता मला सांगते, 'मामनुस्मर युद्ध्य च'- परमश्रेष्ठ सत्याचे स्मरण ठेवून घे झुंज, कर प्रहार.