भारतीय संस्कृती 26
समाजातील शेकडो दु:खांना उपाय जिज्ञासू आर्ताला सुचतात. त्या उपायांतील जे उपाय हितकर वाटतील ते उपाय भक्त हृदयाशी धरतो. जे निरनिराळे विचार त्याला स्फुरतात, त्यांतील हितकर विचारांना तो मिठी मारतो. अर्थार्थी भक्त आता ज्ञानी होतो. म्हणजे जे ज्ञान त्याला निर्मळ वाटते, नि:शंक वाटते, अर्थमय वाटते, त्या ज्ञानाशी स्वत:चे तो लग्न लावतो. फास असो वा गोळी असो, सर्वांठायी त्याची आता तयारी असते. त्या ज्ञानाची, त्या सत्याचा महिमा वाढविण्यात, अपार आनंद त्याला होत असतो. तोच त्याचा मोक्ष, तेच त्याचे सर्वस्व.
लोकांच्या सुखदु:खाशी एकरूप होणे, त्यांच्या वंदनांनी विव्हल होणे, त्या वेदनांची मीमांसा करणे, जे उपाय सुचतील त्यांतील कोणते उपाय अधिक परिणामकारक, अधिक सत्यमय, अधिक मंगलावह हे पाहणे; व असे जे उपाय दिसतील त्यांच्यासाठी सारे आयुष्य देणे, हे ऋषींचे महान ध्येय असते. अशा रीतीने ते प्रयोग करतात व प्राण अर्पण करतात. प्राचीन काळापासून असे संत भारतीय संस्कृतीत झाले आहेत; आजही दिसत आहेत. अशा प्रयोग करणा-या निर्भय, सत्यमय, ध्येयनिष्ठ वीरांनीच समाजाला पुढे नेले आहे.
विष्णुवीर गाढे। कळिकाळ पायां पडे।।
असे ज्ञानोपासक विष्णुवीर कोणालाही भीक घालीत नाहीत. कोणत्याही सत्तेला ते भीत नाहीत. ध्येय-देवासमोर ते लवतात. ध्येय-देवाला पूजितात. दुसरा देव त्यांना माहीत नाही!
असा ध्येयाने पेटलेला महात्मा समाजात उभा राहिला, म्हणजे सारा समाज शेवटी पेटल्याशिवाय राहात नाही. त्याच्या महान प्रयोगात जनता सामील होते. ज्याप्रमाणे एखादा महान वृक्ष हळूहळू तपस्येने वाढतो, त्याला फुलेफळे येतात, मग वार येतो, त्या वृक्षाची बीजे तो महान वारा दशदिशांत फेकतो आणि जंगलेच्या जंगले उभी राहतात; त्याप्रमाणे एक असा दिव्य-भव्य सत्याचे प्रयोग करणारा उभा राहतो, त्याच्या प्रयोगाची बीजे लाखो हृदयांत पडतात. मग त्याच्याभोवती त्या ध्येयाचे लाखो उपासक उभे राहतात! कारण शेवटी मनुष्य हा सत्यमय आहे. त्याच्या आत्म्याचा नैसर्गिक स्वभाव जागृत होतो. मांगल्याची हाक त्याच्या हृदयाला ऐकू येते.
अशा रातीने महान चळवळी होतात. प्रचंड क्रांत्या होतात. मानवजाती एक पाऊल पुढे टाकते. असे प्रयोग करीत मानवजात चालली आहे. जो समाज असे प्रयोग करणार नाही तो मरेल. जी संस्कृती असे प्रयोग करणार नाही, ती पै किंमतीची होईल.