भारतीय संस्कृती 50
ज्ञान
आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान व भक्ती यांचा समन्वय पाहिजे.
ज्ञान दोन प्रकारचे आहे. एक आध्यात्मिक ज्ञान व दुसरे विज्ञान. कर्म चांगले व्हावयास या दोन्ही हातांची आवश्यकता आहे. आध्यात्मिक ज्ञान म्हणजेच अद्वैत. सारी मानवजात माझी आहे, हे सर्व माझेच भाऊ, आणि यांची सेवा करावयासाठी मला विज्ञान पाहिजे आहे, अशीच जी दृष्टी ती ज्ञान विज्ञानात्मक दृष्टी.
ही दृष्टी जोपर्यंत नाही, तोपर्यंत विज्ञान सुरक्षित नाही. विज्ञानाच्या पाठीमागे हे अद्वैताचे तत्त्वज्ञान जर नसेल, तर विज्ञान सर्व जगाची होळी करील. विज्ञानाने संसार सुंदर होण्याऐवजी भयाण होईल.
टॉलस्टॉय म्हणूनच म्हणत असे की, “इतर शास्त्रांचे अभ्यास आधी बंद करा. समाजात परस्परांविषयी कसे वागावयाचे त्याचे शास्त्र आधी सिद्ध होऊ दे.” सर्व शास्त्रांत मुख्य शास्त्र म्हणजे हे समाजशास्त्र आहे. म्हणूनच भारतीय संस्कृती अद्वैताचे शास्त्र पुढे करून प्रगती पाहते. समाजात सर्वांना सुख मिळावे, सर्वांना ज्ञान मिळावे, सर्वांना पोटभर खायला मिळावे, अंगभर ल्यायला मिळावे, सर्वांच्या विकासाला वाव असावा. कोणी कोणास हिणवू नये. प्रबळाने दुर्बळाला पिळू नये, दुस-यास गुलाम करू नये, स्वतःच्या हवेल्या बांधून दुस-यांच्या घरांच्या होळ्या करू नयेत. इटालियन जगावेत म्हणून अबिसीनियाने मरावे असे होऊ नये. अशा प्रकारचा सिद्धान्त आधी स्थापन झाला पाहिजे. राष्ट्राराष्ट्रांचे, जातिजातीचे असे प्रेमाचे संबंध जोपर्यंत मानण्यात येत नाहीत तोपर्यंत जगात खरी शांती येणार नाही, खरे स्वातंत्र्य येणार नाही.
आज जगात कोण स्वतंत्र आहे ? कोणीही स्वतंत्र नाही. आपणांस वाटते की इटली स्वतंत्र आहे, जर्मनी स्वतंत्र आहे, जपान स्वतंत्र आहे ; परंतु ही भूल आहे. एक गुलाम असताना दुसरा स्वतंत्र होऊ शकत नाही. आपण सिंह हा पशूंचा राजा मानतो. परंतु सिंह हा सारखा मागे पाहात असतो. त्याला वाटत असते, की आपणांस कोणी खावयास येईल ! तो सिंह हत्तीचे रक्त प्राशून आलेला असतो. त्याचे मन त्याला खाते. त्याने मन म्हणते, “तुला कोणी खावयास येईल, तुझे रक्त पिण्यास येईल.”
जगातील स्वतंत्र राष्ट्रांची हीच दशा आहे. जपानला वाटते, रशिया प्रबळ झाला. रशियाला वाटते, जर्मनी स्वारी करील. इंग्लंडला वाटते की इटली प्रबळ होत आहे. फ्रान्स जर्मनीला भीतच असतो. अशा प्रकारे सर्वत्र भीतीचे साम्राज्य आहे. बंदुकीवर हात ठेवून सारे सुखाची भाकरी खाऊ पाहात आहेत ! बाँबगोळे जवळ ठेवून चहा पीत आहेत ! तलवारी उशाला घेऊन झोपत आहेत ! त्याने गुप्त तह नाही ना कोठे केला, त्याने नकळत आरमार नाही ना वाढविले, त्याने नवीन मारक शोध नाही ना लाविला, अशी धास्ती एकमेकांना वाटत असते. जिकडेतिकडे गुप्त पोलिसांचा सुळसुळाट, सर्वत्र कारस्थाने, कट, कारवाया ! असे हे जगाचे नरकाचे रुप आहे. सर्वत्र भय, भीती, धोका आहे. शाश्वती क्षणाची नाही. केव्हा आग-डोंब पेटेल याचा नेम नाही.
जगात जोपर्यंत हिंसा आहे, स्वार्थ आहे, तोपर्यंत जगाचे असेच स्वरूप राहावयाचे. माझ्या पोळीवर तूप पाहिजे, मला माडी पाहिजे, दुस-याचे काही का होईना, ही वृत्ती जोपर्यंत आहे, तोपर्यंत सारे भयभीतच राहणार. हिंसा ही भित्री आहे. हिंसेला आपली कोणी हिंसा करील का अशी सदैव भीती असते. जगात प्रेमच निर्भय असते.
“आनन्दं ब्रह्मणो विद्वान् न बिभेति कदाचन !” ब्रह्माची गाठ घेणारा निर्भय असतो, त्याला स्व-पर नाही. सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून तो धडपडतो.