भारतीय संस्कृती 91
''ही मेखला पावन करणारी आहे. ही मेखला मला वेडेवाकडे बोलू देणार नाही. मेखला मला सुख देईल. प्राण आणि अपान यांच्याद्वारे सामर्थ्य देईल. ही मुखला तेजस्वी लोकांना प्रिय आहे. सत्याचे रक्षण करणारी, तपाला आधार देणारी, राक्षसांना मारणारी व शत्रूंना हाकलून देणारी अशी ही मेखला आहे. हे मेखले! कल्याणकारक गोष्टीसह येऊन तू मला सर्व बाजूंनी वेढा दे. तुला धारण करीत असता कधीही नाश न होवो. ''
ज्याची कमर कसलेली आहे, त्याच्याकडे वाकड्या नजरेने कोण पाहील? ''ज्वलन्निव ब्रह्ममयेन तेजसा ।'' ब्रह्मचर्याच्या तेजाचा तो धगधगीत लोल असतो. सर्व आन्तर्बाह्य शत्रू त्याच्यापासून पळतील. मेखला बांधणे म्हणजे व्रतांनी बांधणे. मेखला बांधण्याच्या आधी दीक्षा देण्याचा एक विधी असतो, त्या वेळेस गुरु म्हणतो:
''मम व्रते हृदयं ते दधमि
मम चित्तमनुचितं ते अस्तु
मम वाचमेकत्रता जुषस्व
बृहस्पतिष्ट्वा नियुनक्तु मह्यम्''
''हे बटो! तुझे हृदय माझ्या व्रताच्या ठिकाणी मी ठेवतो. माझ्या मनापाठोपाठ तुझे मन असो. एकनिष्ठेने, एकाग्रतेने माझे सांगणे ऐकत जा. तो बुध्दिपूजक बृहस्पती तुझी योजना माझ्याकडे करा. ''
गुरुचे शब्द नीट ऐकण्यासाठी व्रते पाहिजेत. एकाग्रता पाहिजे. आणि ब्रह्मचर्य म्हणजे व्रतांचा राजा, ब्र२चर्यात सर्व व्रते येऊन जातात. बटुचे हात हातात घेणारा गुरूही देवरुप मानला आहे:
सविता ते हस्तमग्रभीत्
अग्निराचार्यस्वत
''बाळा ! अरे, मी नाही तुझे हात घेत, तर बुध्दीला चालना देणारा सवितादेव तुझे हात धरीत आहे. अग्नी हा तुझा आचार्य; मी नाही. गुरु म्हणजे प्रकाश. ज्ञानप्रकाश देणा-या तेजोरूप गुरुची उपासना ब्रह्मचा-याने करावयाची आहे. उपनयनाच्या मंत्रात किंवा यज्ञोपवीताच मंत्रात सर्वत्र तेजाची उपासना आहे. ब्रह्मचारी सर्व तेजस्वी देवतांचा आहे:
देव सवितरेष ते ब्र२चारी
तं गोपाय समामृत ॥
''हे सूर्यनारायणा! हा ब्रह्मचारी तुझा आहे. त्याचे सरंक्षण कर. त्याला मरण प्राप्त न होवो. ''
ब्रह्मचर्याश्रमात जाणे म्हणजे जणू पुनर्जन्म. आता संयमी व्हावयाचे. ध्येयाची उपासना सुरू करावयाची:
युवा सुवासा: परिवीत आगात्
स उ श्रेयान् भवति जायमान: