भारतीय संस्कृती 57
संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वतःसाठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीवनिर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे. हे जीवन ज्यांचे त्यांना सेवेद्वारा अर्पण करावयाचे आहे.
या जीवनाला म्हणून कीड लागू देता कामा नये. देवाच्या पूजेसाठी न वास घेतलेले फूल न्यावयाचे, न कोमेजलेले, न किडलेले ; रसमय व गंधमय असे स्वच्छ, सुंदर फूल न्यावयाचे. आपले जीवनपुष्पही समाजदेवाला अर्पण करावयाचे आहे. हे जीवन रसमय व गंधमय व्हावयास पाहिजे असेल तर संयमाची अत्यंत जरूरी आहे.
इंद्रियांना उत्तरोत्तर उदात्त आनंदाची सवय लाविली पाहिजे. खाण्यापिण्याचा आनंद हा पशुपक्षीही घेतात. मनुष्य हा केवळ खाण्यापिण्यासाठी नाही. त्याला खाणे पाहिजे ; परंतु दुस-या ध्येयासाठी ते खाणे पाहिजे आहे. खाणे-पिणे-झोपणे ही माझ्या पूर्णतेच्या ध्येयाची साधने झाली पाहिजेत.
न्यायमूर्ती रानड्यांची गोष्ट सांगतात. त्यांना कलमी आंबा आवडत असे. एकदा आंब्यांची करंडी आली होती. रमाबाईंनी आंब्याच्या फोडी करून न्यायमूर्तीसमोर बशी नेऊन ठेविली. न्यायमूर्तींनी त्यांतील एक-दोन फोडी खाल्ल्या. रमाबाईंनी काही वेळाने येऊन पाहिले तर फोडी ब-याच शिल्लक. त्यांना वाईट वाटले. त्या म्हणाल्या, “एवढ्या चिरून आणल्या, तुम्हांला आवडतात, मग का बरे घेत नाही ?” न्यायमूर्ती म्हणाले, “आंबा आवडतो म्हणून का आंबाच खात बसू ? खाल्ली एक फोड. जीवनात दुसरे आनंद आहेत.”
खाण्यापिण्याच्या गोष्टींची चर्चा करण्यात आपला किती वेळ जातो ! जणू जिभेचे गुलाम आहोत आपण. परंतु आपणांस कळले पाहिजे की, शेवटी गोडी वस्तूत नसून माझ्यात आहे. मी माझी गोडी त्या त्या वस्तूत ओततो व ती वस्तू गोड म्हणून खातो. सर्व मधुरता आपल्या अंतरंगात आहे. ती गोडी ज्याला लाभली त्याला काहीही द्या. त्याला सारे गोडच लागेल.
जगातील सर्व थोर पुरुष संयमी होते. त्यांचे खाणेपिणे साधे असे. महंमद पैगंबर साधी भाकर खात व पाणी पीत. लेनिनचा आहार अत्यंत साधा होता. महात्मा गांधी पाच पदार्थापेक्षा अधिक पदार्थ जेवताना घेत नसत. महात्माजींचा आहार-विहार असा नियमित नसता तर इतके अपरंपार काम त्यांना करताच आले नसते. देशबंधू दासांच्या पत्नी वासंती देवी देशबंधूंची फार काळजी घ्यावयाच्या. देशबंधूंच्या जेवणाकडे त्यांचे लक्ष असे. देशबंधूंना त्या म्हणावयाच्या, “आता पुरे, उठा.”
परंतु या आहार-विहाराच्या संयमापेक्षाही दुसरा संयम आहे. समाजात आनंद नांदावा म्हणून या उदात्त संयमाचे जितके महत्त्व गावे तेवढे थोडेच आहे. आपल्या हिंदुस्थानात प्राचीन काळापासून एकत्र कुटुंबपद्धती चालत आली आहे. एकत्र कुटुंबपद्धती संयमाशिवाय चालूच शकणार नाही. संयम नसेल तर दहांची तोंडे दहा दिशांस होतील ! कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्याच इच्छांना जर प्राधान्य देऊ लागेल, तर सर्वांचे पटावयाचे कसे ? सारी आदळआपट व धुसफूस चालेल.