भारतीय संस्कृती 48
कोणी कोणी नुसते मुखाने राम राम म्हणत बसतात. परंतु मुखाने राम म्हणा व हाताने काम करा, सेवा करा. मी माझ्या आईचा नुसता जप करीन तर ते आईला रुचणार नाही. आई म्हणेल, “माझे चार धंदे कर. जा, कळशी भरूण आण.” आईची सेवा न करता मी आई आई म्हणत बसेन तर तो दंभ नाही का होणार ? देवाचे नाव उच्चारा व हाताने सारखी सेवा चालू दे. ती सेवा म्हणजेच देवाचे नाव. महात्माजी एकदा म्हणाले, “चरखा हे माझ्या देवाचेच एक नाव आहे.” ईश्वराला सहस्त्रावधी नावे आहेत. प्रत्येक मंगल वस्तू म्हणजे त्याचेच स्वरूप आहे, त्याचेच नाव आहे.
मुखात देवाचे नाम व हातात सेवेचे काम. कधी कधी ईश्वराचे अपरंपार प्रेम दाटून आपोआप कर्म माझ्या हातून गळेल. समजा, माझ्या खानावळीत जेवणा-या लोकांकडे ही देवाची रुपे आहेत या भावनेने मी पाहू लागलो. एखाद्या वेळेस ही भावना इतकी वाढेल, की मी वाढणे विसरून जाईन. त्या देवाच्या मूर्तीकडे पाहातच राहीन. माझे डोळे घळघळ वाहू लागतील. अष्टभाव दाटतील. रोमांच उभे राहतील.
‘तनुवरी गुढियाच उभारती’
असा अनुभव येईल.
अशा रीतीने कर्म गळून पडणे म्हणजेच शेवटची स्थिती. ती कर्माची परमोच्च दशा होय. त्या वेळेस समोरचे जेवणारे न खाता तृप्त होतील. त्या वाढणा-याच्या डोळ्यांतील प्रेमगंगांनी ते पुष्ट होतील. म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणत, “ईश्वराचे नाव उच्चारताच जोपर्यंत तुझे डोळे भरून येत नाहीत तोपर्यंत कर्म सोडू नकोस.”
परंतु ती धन्यतेची स्थिती येताच जे पापात्मे खुशालचेंडूप्रमाणे भोजने झोडतात आणि मुखाने वरवर ‘नारायण नारायण’ म्हणतात, त्यांना समाजाने शेणगोळ्याप्रमाणे दूर भिरकावून दिले पाहिजे. भारतीय संस्कृती असे भिरकावून देण्यास सागंत आहे.
भारतीय संस्कृती सांगते, “कोणते तरी सेवाकर्म हाती घ्या, त्यात रमा. निरहंकारी व्हा. निःस्वार्थ व्हा. त्या कर्माने समाजदेवतेची पूजा करावयाची आहे. हे विसरू नका ; आणि उत्तरोत्तर ते सेवाकर्म उत्कृष्ट करीत करीत एक दिवस हा देह पडू दे व त्याचे सोने होऊ दे.” भारतीय संस्कृती म्हणजे सेवेचा, कर्माचा अपरंपार महिमा.
परंतु आज ही संस्कृती भारली गेली आहे. मी रस्त्यात कर्मशून्य होऊन नारायण म्हणत बसलो, तर माझ्यापुढे पैशांचे ढीग पडतात. परंतु मी रस्त्यातील घाण दूर करीन, विष्ठा उचलीन तर मला प्यायला पाणी मिळत नाही ; मग पोटभर जेवावयाची तर गोष्ट दूरच राहिली ! कर्महीनांना पाद्यपूजा मिळत आहेत आणि कर्ममय, श्रममय ज्यांचे जीवन आहे, त्यांना लाथा बसत आहेत, त्यांचा पदोपदी उपहास होत आहे ! भारतीय संस्कृतीचा आत्मा चिरडला गेला आहे. ज्यांना ज्यांना भारतीय संस्कृतीचा अभिमान असेल, त्यांनी स्वतः कर्ममय ज्यांचे जीवन आहे त्यांना पूजावयास उठले पाहिजे.
तैं झडझडून वहिला नीघ। इये भक्तीचिये वाटे लाग।
तैं पावसी अव्यंग। निजधाम माझें।।
मोक्षाचे, आनंदाचे परमधाम पाहिजे असेल, जेथे कोणतेही व्यंग नाही, दुःख नाही, वैशम्य नाही, दुष्काळ नाही, दारिद्र्य नाही, अज्ञान नाही, घाण नाही, रोग नाही, भांडण नाही, क्रोध-मत्सर नाही, ते परम मंगल स्वातंत्र्याचे धाम पाहिजे असेल, तर सारे मिथ्या अभिमान, सारी श्रेष्ठ-कनिष्ठपणाची कुभांडे, सर्व आलस्य, सारे स्वार्थ, सर्व भ्रामक कल्पना झडझडून फेकून द्या, आणि या सेवामय, कर्ममय, वर्णधर्ममय भक्तीच्या वाटेला लागा.