भारतीय संस्कृती 42
संत ती ती सेवाकर्मे करून मुक्त झाले याचे कारण हेच होय. कबीर वस्त्रे विणी, वस्त्रे विणण्याचा त्याला कंटाळा नसे. तो त्या कर्मात रमे. तो वेठ मारीत नसे. “समाजरूपी देवाला ही वस्त्रे द्यावयाची आहेत ; या माझ्या कर्मकुसुमांनी समाजदेव पूजावयाचा आहे”, अशी भावना त्याच्या हृदयात असे. त्यामुळे त्याचे ते कर्म उत्कृष्ट होई. भक्तिविजयात लिहिले आहे की बाजारात कबीर वस्त्रे मांडून बसे. लोक ती सणंगे पाहात. परंतु ती विकत घेण्याचे त्यांना होत नसे. त्या वस्त्रांची अनंत किंमत असेल असे त्यांना वाटे. ही सणंगे अमोल आहेत असे लोक म्हणत. त्या सवंगांवर लोकांची दृष्टी खिळून बसे. ती वस्त्रे ते पाहात उभे राहात. खरेच आहे. ती साधी वस्त्रे नव्हती. त्या वस्त्रांत कबिराचे हृदय ओतलेले असे. ज्या कर्मात हृदय ओतलेले आहे, आत्मा ओतलेला आहे त्या कर्माचे मोल कोण करील ? त्या कर्माने परमेश्वर मिळत असतो, मोक्ष लाभत असतो.
गोरा कुंभार मडकी घडवी. त्याचे ते आवडीचे कर्म होते. परंतु ज्यांना मडकी द्यावयाची, त्या गि-हाइकांबद्दल त्याला अपरंपार प्रेम वाटे. जनता म्हणजे त्याला रामाचे रूप वाटे. लोकांना फसवावयाचा विचारही त्याच्या मनात येत नसे. आज दिलेले मडके उद्या फुटेल, मग लौकर नवीन मडके खपेल असा विचार तो करीत नसे. बापाने विकत घेतलेले मडके मुलांच्या हयातीतही दिसेल, अशा वृत्तीने गोरा कुंभार मडकी बनवी.
म्हणून मडक्याची माती तुडविताना तो कंटाळत नसे. ते माती तुडविण्याचे काम वेद लिहिण्याइतकेच, गणितातील गहन सिद्धान्ताइतकेच पवित्र व महत्त्वाचे त्याला वाटे. ती माती तुडविता तुडविता तो स्वतःला विसरे. त्या मातीत स्वतःचे रांगत आलेले मूल तुडविले गेले तरी त्याला भान नव्हते ! जनताजनार्दन त्याच्या अंतश्चक्षूंसमोर होता. मडके विकत घ्यावयास येणारा परमेश्वर त्याला दिसत होता. अशी तन्मयता मोक्ष देत असते; जीवनात अखंड आनंद निर्माण करीत असते. त्या आनंदाला तोटा नाही, त्या आनंदाचा वीट येत नाही. तो अवीट, अखूड, अतूट असा निर्मळ आनंद होता.
कर्म लहान की मोठे हा प्रश्नच नाही. ते कर्म करताना तुम्ही स्वतःला किती विसरता, हा प्रश्न आहे. कर्माची किंमत स्वतःला विसरण्यावर आहे. एखादा म्युनिसिपालिटीचा अध्यक्ष घ्या, तो लाखो लोकांची सेवा करीत असतो. परंतु त्याचा अहंकारही तेवढाच जर मोठा असेल, तर त्या कर्माची किंमत नाही.
आपण ही गोष्ट गणितात मांडू याः
म्युनिसिपालिटीच्या अध्यक्षाचे काम ; किती जणांची सेवा, ते अंशस्थानी लिहा आणि त्याचा अहंकार छेदस्थानी लिहा.
तीन लाख लोकांची सेवा
अहंकारही तेवढाच
या अपूर्णांकाची किंमत काय ? किंमत एक.