भारतीय संस्कृती 54
महात्माजी आज हे करीत आहेत. महात्मा गांधीना भेद माहीत नाहीत. अद्वैत त्यांच्या रोमरोमांत बाणले आहे. सर्वत्र त्यांना नारायणच दिसत आहे. परंतु या नारायणाची सेवा शास्त्रीय दृष्टीने ते करू पाहात आहेत. महात्माजींना विज्ञान पाहिजे आहे. चरख्यात सुधारणा करणा-यांना त्यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ केले होते. अर्थशास्त्रावर निबंध लिहिणारास एक लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले आहे. त्यांना संशोधन पाहिजे आहे ; कल्याणवह संशोधन पाहिजे आहे. खाण्यापिण्याचे ते प्रयोग करतात. गूळ चांगला की साखर चांगली, सडलेले तांदूळ चांगले की असडिक तांदूळ चांगले, हातसडीचे तांदूळ हितकर की यांत्रिक तांदूळ सत्त्वयुक्त. कोणते पाले खावेत, घोळीची भाजी, निंबाचा पाला, वगैरेंत कोणती सत्त्वे आहेत ; चिंचेचे सरबत चांगले की वाईट ; कच्चे खावे की शिजलेले खावे, मधाचा काय उपयोग, मधूसंवर्धनविद्या देशात कशी वाढेल, एक की दोनशेकडो प्रकारचा विज्ञानविचार महात्माजी करीत असतात. आजारीपणात पाणी, माती प्रकाश वगैरे नैसर्गिक उपचारांचा उपयोग ते करू पाहतात. कारण हे उपाय स्वस्त व सुलभ आहेत. आपल्या बांधवांचा संसार सुंदर व्हावा म्हणून महात्माजींची कोण आटापीटा, केवढे प्रयोग, किती कष्ट !
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बुद्धीचा दिवा घेऊन ते जात आहेत. विज्ञानाला घेऊन जात आहे. संसाराला, सर्व जनतेच्या संसाराला सौदर्य देणारे, समृद्धी देणारे विज्ञान त्यांना पाहिजे आहे. ज्ञान-विज्ञानाची उपासना करणारे व त्यात भक्तीचा जिव्हाळा ओतणारे असे महात्माजी म्हणजे भारतीय संस्कृतीची मूर्ती आहेत. भारतीय संस्कृती म्हणजे ज्ञानयुक्त, विज्ञानयुक्त व भक्तियुक्त केलेले शुद्ध कर्म ! असे कर्म कसे करावे हे महात्माजींसारख्यांपासून शिकावे. महात्माजींच्या रुपाने भारतीय संस्कृतीचा आत्माच अवतरला आहे असे मला वाटते.
अशी ही भारतीय संस्कृती संपूर्ण आहे. ती कोणत्याही एकाच गोष्टीला महत्त्व देणारी नाही. ती मेळ घालणारी आहे. शरीर व आत्मा दोघांना ती ओळखते. शरीरासाठी विज्ञान व आत्म्यासाठी ज्ञान ! शरीराने नटलेल्या या आत्म्याला, विज्ञानाने नटलेले अधात्म व अध्यात्माने नटलेले विज्ञान यांचीच जरूर आहे. भारतीय जनता हे दिव्य सूत्र ओळखील तो सुदिन !