भारतीय संस्कृती 127
विश्वमित्राने धनुर्विद्यावेत्ता होता; परंतु त्याने अहिंसेचा वसा घेतला. स्वत:चे संरक्षण व्हावे अशी तर इच्छा ! तेव्हा परभारे राम-लक्ष्मणांकडून राक्षसांचा नि:पात करण्याचे त्याने ठरविले. आणि हिंसेचे साधनही त्या राजकुमारांच्या हातात त्याने दिले; अशाने त्या हिंसेची जबाबदारी त्या विश्वमित्रावर नव्हती का येत? राम-लक्ष्मणांपेक्षा त्यांना हिंसेचे साधन देऊन हिंसा करावयास शिकविणारा विश्वमित्राच अधिक हिंसक ठरतो. अहिंसेचे पुण्य अशा लटपटीने पदरात पडत नसते.
एखादा मनुष्य विंचू पाहताच दुस-याला हाक मारतो. त्याच्या हातात चप्पल देतो. त्याला विंचू दाखवितो आणि म्हणतो, “मार, मार लौकर ! पळेल, जाईल-” अशा माणसाला अहिंसेचे पुण्य कसे लागणार? त्याचप्रमाणे विश्वमित्रासारख्यांची स्थिती.
केवळ क्षत्रियांवरच हिंसेचे कर्म सोपविल्यामुळे ते भयंकर हिंसक झाले. ते बलवान झाले. शत्रू नसेल तेव्हा ते प्रजेलाच छळू लागले ! परशुरामाला हे सहन झाले नाही. हे माजलेले क्षत्रिय नाहिसे करावे असे त्याने निश्चित केले. हातात धनुष्यबाण व खांद्यावर कु-हाड घेऊन तो क्षत्रियांना निपटीत चालला. क्षत्रियांचा तो कर्दनकाळ झाला. पुन:पुन्हा क्षत्रियांची छाटणी त्याने चालविली. बियालाही काणी क्षत्रिय उरू नये असे त्याला वाटत होते. एकवीस वेळा त्याने पृथ्वी नि:क्षत्रिय केली; परंतु पुन्हा क्षत्रिय उगवतच !
शस्त्राने शस्त्र बंद करता येत नाही. तलवारीने तलवार दूर होणार नाही. युद्धाने युद्ध बंद होणार नाही. परशुरामाचा प्रयोग अपयशी झाला. सर्वांना पुन:पुन्हा मारीत सुटण्याच्या अभ्यासाने स्वत: परशुरामाच एक भयंकर क्षत्रिय झाला ! तो ब्राह्मणांना क्षत्रिय बनवू लागला. स्वत:जवळची शस्त्रविद्या ब्राह्मणांस शिकविण्याचे त्याने ठरविले. ब्राह्मणांशिवाय कोणासही मी शस्त्रविद्या शिकविणार नाही असे त्याने घोषित केले. भीष्माला त्याने आधी ही विद्या दिली होती. कर्ण त्याच्याजवळ चोरून शिकला. परशुरामापासून शेकडो क्षत्रिय या प्रकारे तयार झाले. हिंसेने अहिंसा निर्माण करणा-या परशुरामाने अधिक हिंसक निर्माण केले.
परशुरामाचा हेतू चांगला होता; परंतु त्याचा मार्ग चुकला. त्याचा प्रयोग सिद्धीस गेला नाही. ययातीच्या प्रयोगाप्रमाणेच हाही एक मोठा प्रयोग होता. भोग भोगून भोगून ययाती विरक्त होऊ पाहात होता. जगात वीस वर्षे हिंसाकाण्ड माजवून अहिंसा स्थापण्याचा प्रयोग परशुराम करू पाहात होता; परंतु जगात जे पेरू तेच उगवेल. हिंसेला अहिंसेची फळे कशी लागणार?
हिंसेने हिंसा संपणार नाही, युद्धाने युद्ध थांबणार नाही. असे जर असेल तर या युद्धातच जितकी कमी हिंसा करता येईल तितकी करावी असे ठरले. युद्ध टळत नाही; परंतु इतके तरी करू या : ज्याच्याजवळ शस्त्र नाही, त्याच्यावर शस्त्र उगारू नये. एकावर अनेकांनी हल्ला करू नये. दुसरा अडचणीत असता त्याच्याशी लगट करू नये. रात्री युद्ध करू नये. पदातींनी पदातींशी, रथींनी रथींशी, गदीनानी गदीनांशी लढावे. असे निरनिराळे युद्धधर्म निश्चित करण्यात आले. या सर्वांचा हेतू हिंसा कमी व्हावी, आवश्यक तेवढीच व्हावी, असा होता. या हिंसेतही अहिंसेची आठवण माणसाने ठेविली होती.
विश्वमित्र परभारे हिंसा करून अहिंसेचे पुण्य जोडू पाहात होता. परशुराम स्वत: हिंसक बनून अहिंसा स्थापू पाहात होता. हे दोन्ही प्रयोग चुकीचे होते. परंतु विचारी मनुष्य स्वस्थ बसला नाही. हिंसेवर उपाय शोधून काढणे जरूरच होते. हिंसेने हिंसा शमत नाही हे पाहिल्यावर स्वत: अहिंसक होऊन हिंसेला तोंड देण्याचे महात्माजींनी ठरविले. स्वत:च्या जीवनात हा अहिंसेचा प्रयोग हळूहळू त्यांनी सुरू केला. मुलाला मारून मुलगा सुधारतो, की त्याला न मारता प्रेमाने समजावून दिल्याने तो सुधारतो? चाबकाने घोडा ताब्यात येतो, की त्याला वेळेवर चंदी दिल्याने. त्याचा खरारा केल्याने ताब्यात येतो? क्षमेचे सामर्थ्य अधिक की शस्त्राचे बळ अधिक? प्रेम बलवान की प्रहार बलवान?