भारतीय संस्कृती 62
मुले खेळतात. खेळताना आपणास इतका व्यायाम होईल, आपले शरीर असे सुधारेल, वगैरे विचार त्यांच्या मनात नसतात. हे विचार मनात आणून मुले खेळतील तर खेळाचा आनंद त्यांना लुटता येणार नाही. आट्यापाट्या खेळताना माझ्या मांड्यांना आता व्यायाम होत आहे असा का विचार करून खेळाडू खेळेल ? असा विचार करून त्याला कोंडी फोडता येणार नाही. मुले खेळासाठी म्हणून खेळतात. त्याने मिळणारे जे व्यायामाचे फळ, त्या फळाकडे खेळताना त्यांचे लक्ष नसते.
याचा अर्थ असा नाही, की खेळ खेळणा-याला व्यायामाचे फळ मिळत नाही. त्याची प्रकृती निरोगी राहते. तो आनंदी राहतो. तो मनमोकळा होतो. कितीतरी फळे त्याला मिळतात. खेळ खेळावयास जाण्यापूर्वी, खेळाला आरंभ करण्यापूर्वी, व्यायामाचा विचार त्यांच्या मनात असतो. मी जर रोज खेळत जाईन, तर माझी प्रकृती निकोप राहील असे तो ठरवितो. फळाचा विचार प्रथम मनात असतो. परंतु एकदा कर्म सुरू झाले म्हणजे त्या फलाचा विसर पडला पाहिजे. प्रत्येक प्रयत्न म्हणजे कर्मसिद्धी आहे, प्रत्येक घाव म्हणजे विजय आहे, प्रत्येक टाकलेले पाऊल म्हणजे ध्येयप्राप्ती आहे, असे वाटले पाहिजे. प्रयत्न म्हणजे सिद्धी.
बेलदार मोगरी हातात घेऊन दगड फोडीत असतो. समजा, दहा धावांनी दगड फुटला नाही, आणि अकराव्या घावास तो फुटला, तर ते पहिले घाव फुकट का गेले ? प्रत्येक घाव त्या दगडातील अणूंना आघात करीतच होता. ते अणू अलग केले जात होते. प्रत्येक घाव ध्येयाकडेच नेत होता.
कर्म उत्कृष्ट व्हावे म्हणूनच कर्मफलत्यागाची जरूरी आहे. फळाचे सतत चिंतन करण्यापेक्षा कर्मातच जो रमला, त्याला अधिक थोर फळ मिळेल. कारण पदोपदी फळाचे चिंतन करणा-याचा पुष्कळसा वेळ चिंतनातच जातो. पाऊस नाही पडला तर, भाव नीट नाही आला तर, उंदीर लागला तर, अशी पदोपदी जो काळजी आणि विवंचना करीत बसेल, फळाविषयी विचार करीत बसेल, त्याच्या हातात भरपूर उत्साह राहणार नाही ; त्याच्या मनात अनंत आशा उरणार नाही ; त्याचे कर्म उत्कृष्ट होणार नाही. ह्याच्या उलट, जो शेतकरी कर्मातच रंगला आहे, खत घालीत आहे, पाणी घालीत आहे, निंदणी करीत आहे ; दुसरा विचार करावयास ज्याला वेळच नाही, त्याला अधिक उत्कृष्ट फळ मिळेल यात शंका नाही.
कमळ असते ना, त्याची गोष्ट रामकृष्ण परमहंस नेहमी सांगावयाचे. कमळाला फुलावयाचे असते. रात्रंदिवस चिखलात पाय रोवून ते धडपडते. सूर्याकडे तोंड करून ते फुलू पाहात असते. त्या कमळाची साधना सारखी अखंड सुरू असते. स्वतःचे फुलणे विसरून जाते. फळाला जणू विसरून जाते. थंडी, ऊन, वारा, पाऊस, चिखल यांत राहून धडपडत असते. परंतु एक दिवस उजाडतो. ते कमळ मंद-मधुर फुलते. सूर्याचे किरण त्याला चुंबितात. वारे त्याला आंदुळतात ; गाणी म्हणतात. आपण फुललो आहोत, याचे भान त्या कमळाला जणू नसते. सुगंधाने, पावित्र्याने, मकरंदाने मी भरून राहिलो आहे, याची जाणीव त्याला नसते. शेवटी भ्रमर गुं गुं करीत येतो. त्या कमळाभोवती प्रदक्षिणा घालतो. त्या कमळाच्या अंतरंगात तो शिरतो व सांगतो, “पवित्र कमळा ! तू फुलला आहेस. किती गंध, कसा रंग ; किती गोड रस !”
मनुष्याचे असेच झाले पाहिजे. फळाचा विचार पडला पाहिजे. फळ पायाशी येऊन पडले तरीही तिकडे दृष्टी जाता कामा नये. ध्रुवाच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष नारायण येऊन उभा राहिला, तरी त्याचे डोळे मिटलेलेच ! नारायणाच्या चिंतनातच तो तल्लीन झाला होता. इतकी समरसता साधनेत होणे ही महत्त्वाची वस्तू आहे.