भारतीय संस्कृती 107
जगात आपणास एकमेकांना सुधारावयाचे आहे. दगड मुलाला शिकविण्यातच गुरूची कसोटी. दगडांना जर गुरू दूर लोटील, तर तो गुरू कसला? दगड पाहून गुरूच्या प्रतिभेला पाझर फुटले पाहिजेत. येथे आपल्या कलेला खरा अवसर आहे. प्रयोगाला पूर्ण वाव आहे, असे त्याला वाटले पाहिजे. स्त्रीही पतीच्या बाबतीत असेच म्हणेल, “ माझ्या नाठाळ पतीची मी गुरू होईन. त्यांना सुधारणे हेच माझे दिव्य कर्म. मी आशेने प्रयत्न करीत राहीन.”
इब्सेनचे’ ‘पीर जिन्ट’ म्हणून एक काव्यमय नाटक आहे, किंवा नाट्यमय काव्य आहे. पीर जिन्टची पत्नी रानातील एका झोपडीत त्याची वाट पाहात असते. पीर जिन्ट जगभर भटकत असतो. जगातील नानाविध अनुभव घेतो. कितीतरी वर्षांनी भारावलेला असा तो आपल्या पत्नीच्या दारात उभा राहतो. पत्नी अंधळी झालेली असते. ती चरख्यावर सूत काढीत असते. पती येईल असे आशेचे गाणे म्हणत असते.
पीर जिन्ट : हा पाहा मी आलो आहे. दमूनभागून आलो आहे.
ती : या; आलात? मला वाटलेच होते तुम्ही याल. या, तुम्हांला थोपटते, माझ्या मांडीवर निजवते; तुम्हाला ओव्या म्हणते.
पीर जिन्ट : तुझे माझ्यावर अजून प्रेम आहे?
ती : तुम्ही चांगलेच आहात.
पीर जिन्ट : मी चांगला आहे? सारे जग मला वाईट म्हणते. मी का तुला चांगला दिसतो?
ती : हो.
पीर जिन्ट : मी तर वाईट आहे. कोठे आहे मी चांगला?
ती : माझ्या आशेत, माझ्या प्रेमात, माझ्या स्वप्नात तुम्ही मला चांगलेच दिसत आहात...!
अशा स्वरूपाचा त्या पुस्तकाचा अंत आहे. “माझ्या आशेत, माझ्या प्रेमात, माझ्या स्वप्नात” हे शेवटचे शब्द आहेत. त्या शब्दांत स्त्रीचे सारे जीवन आहे. पतीकडे पाहण्याचे तिचे डोळेच निराळे असतात. ती ज्या डोळ्यांनी पाहते, त्या डोळ्यांची आपणांस कशी कल्पना येणार? कितीही दुर्वृत्त पती असो, एक दिवस तो चांगल्या रीतीने वागेल, अशी अमर आशा प्रेमळ स्त्री-हृदयात असते.
घर म्हणजे एकमेकांना माणसाळविण्याची शाळा आहे. पिसाळलेले कुत्रे असते, ते जगाला का चावते? ते कुत्रे जगाचा द्वेष करीत नसते. त्याच्या दातांत विष लसलसते, ते विष कोठे तरी ओतावे असे त्याला वाटत असते. त्याप्रमाणेच माणसाचे आहे. स्वत:चे कामक्रोध कोणावर तरी ओतावेत असे त्याला वाटत असते. ते कोठे तरी ओतले म्हणजे मग शांत होतात. हे पोटातील विष ओतण्याची जागा म्हणजे घर. पती येईल व पत्नीवर रागावेल. सासुरवाशीण मुलावर रागावेल. कोठे तरी आपल्या विकारांना प्रकट व्हावयास अवसर हवा असतो.