कहाणी
तुम्हां आम्ही सांगतों कहाणी । सोळा बारा मिळोनी गढणी । कहाणी सांगती बैसोनी वनीं । जो ऐके तो परपुरुष धनी ॥ १ ॥
चित्त द्यावें आमुच्या बोला । सांडा वायां गलबला । विसरुनी प्रपंचाच्या मुळा । शब्दाचा लागों द्या चाळा ॥ २ ॥
एक अघटित वर्तलें । एक नारीस पांच पती देखिले । एका पुरुषा गरुवार केलें । साठ पुत्र जन्मले बळे ॥ ३ ॥
एका ब्राह्मणें कुत्रें खादलें । ग्रामजोशा प्रायश्चित्त दिलें । एका नारीनें कवसाल केलें । बापाभावांसी लग्न लाविलें ॥ ४ ॥
आई होउनी करवली । लेक वांटितसे हळदुली । पती विव्हळ म्हणोनी जाकळी । आमुच्या कहाणीची हे मुळी ॥ ५ ॥
कहाणी सांगे शिवशक्ति । तेणें एका जनार्दनीं तृप्ति । संत महंत आनंदती । अभाविकां न कळे गती ॥ ६ ॥