जोहार
जोहार मायबाप जोहार । माझें नांव विठनाक महार । सांगतों ऐका एक विचार । तो बळकट धरा की जी मायबाप ॥ १ ॥
गांव पांचा पाटलांचा । पंचवीस प्रजेचा । तेथें कारभार सहा जणांचा । तो ऐका की जी मायबाप ॥ २ ॥
ज्या धन्याचे पदरीं शेर । त्यासी नाहीं कधीं जोहार । अवघा आईजीचा कारभार । काम करितों की जी मायबाप ॥ ३ ॥
आवाजीनें हवालीं केला गांव । धन्याचें विसरला नांव । तलफ आल्यावरी ठाव । पळावया कैंचा की जी मायबाप ॥ ४ ॥
जेव्हां तलफ लागे बाकीची । तेव्हां तुम्हां आम्हां सद्बुद्धि कैंची । म्हणवूनियां सहा जणांची । भीड धरूं नका की जी मायबाप ॥ ५ ॥
सहा जणें राहतील एकीकडे । गांठ तुम्हा आम्हांसीच पडे । मग कोणीकडे तिकडे । हालों न देता की जी मायबाप ॥ ६ ॥
करा भक्तीची कुळवाडी । धरा हरिनामाची गोडी । नाहीं तर चौर्यांयशीची बेडी । पायीं पडेल की जी मायबाप ॥ ७ ॥
तेथील मार्ग सपाट । विष्णुलोकीं वाजवा घांट । मग धुडधुडा वाट । धांवाल की जी मायबाप ॥ ८ ॥
एका जनार्दनीं कुळवाडी मोठा । तेणें बाकीस मारिला फाटा । उघडा केला दारवंटा । कैलासीचा की जी मायबाप ॥ ९ ॥