जोहार
जोहार जिवाजीपंत ठाणेदार । तुमचे गांवची वस्ती खबरदार। पहावया वागणूक साचार ।
मज धन्यांनी रवाना केले की जी मायबाप ॥ १ ॥
धन्यांनी सांगितलें मला । जिवाजीस आपण गांव दिला ।
तेणें गांवांतील वसुल बुडविला । ऐसें हें बरें नोहे की० ॥ २ ॥
गांवची आबादी तुम्ही करा । धन्याचा कउल पुरा करा ।
जमीन वजवून भरा सारा । पीक पिकवा भक्तीचे की० ॥ ३ ॥
पीक पिकेल अपार । तेथें मागते येतील निर्धार ।
त्यांसी दया शांतीचा विचार । करून दान द्या की० ॥ ४ ॥
या पिकांचीं पाखरें तोडा । कामक्रोध भूस झाडा ।
आशा मनीषा तृष्णांचा तिवडा । करूनि खळें शुद्ध करा की० ॥ ५ ॥
धन्याचे बाकी पुरतें द्यावें । बाकी फिटतां वजा आपण घ्यावें ।
हें मूळचें बोलणे आहे । धन्याचें की० ॥ ६ ॥
तुम्ही तो पीक पिकवून । केलें नाही बाकीचें खंडन ।
बाकी धन्याची ठेवून । तसेच बसला की० ॥ ७ ॥
ही वागणूक तुमची नाहीं बरी । धन्याची बाकी चुकवा सारी । एका जनार्दनीं निर्धारी ।
पीक पिकें निर्धारी । प्रेमाचें की जी मायबाप ॥ ८ ॥