जोहार
महार बोलतो बोला । तुम्ही सांडा गलबला । शत वर्षांचा नेम भरला । आतां हुशार राहा की जी मायबाप ॥ १ ॥
येईल यमाजीची चिठी । बोलूं नेदी जाल उठाउठी । वोंगळवाणी कराल दिठी । कोण सोडविणार की० ॥ २ ॥
कांहीं तरी हित करा । कामक्रोध परते सारा । नामस्मरण लक्ष धरा । हाचि विचार करा की० ॥ ३ ॥
मागील बाकी अवघी झाडा । नाहीं तरी पायीं पडेल खोडा । बसावयाचा तुमचा घोडा । राहील घरचा घरीं की० ॥ ४ ॥
शरण एका जनार्दनीं । माय बापा संत धनी । लक्ष लावा त्यांचे चरणीं । हाचि विचार करा की जी मायबाप ॥ ५ ॥