महारीण
स्वामीनीं मजवर पूर्ण कृपा केली । पंच हजार दौलत दिधली । म्हणोनि कायापुरीं वस्ती केली । प्रिया राणी भेटली की जी मायबाप ॥ १ ॥
प्रिया महाराणी मीच महारीण । सकळ जमेदार माझे आधीन । माझेपुढें न चले कवणाचें वचन । धर्म नगरीचे लोक गांजिले की जी मायबाप ॥ २ ॥
माझेमुळें मसुदी मातले । नाईकवाडे लावालाव करूं लागले । शेटे महाजन उन्मत्त जाहले । मेहेत्र्यानें जन गांजिले । आत्म्यांत की जी मायबाप ॥ ३ ॥
केसापुरचे लोक सांडिली उरी । बागाईत जिराईत नाहीं काळीवरी । उरली पांढरी सांगावी की जी मायबाप ॥ ४ ॥
नयिनाबाजीची दृष्टी गेली । येतां जातां भ्रमिष्ट झाली । भय हाकिमाचे की जी मायबाप ॥ ५ ॥
नाकेगांव धाकेच पळालें । तोंडापूर लबलबा करू लागलें । बत्तीस शिरांचे लोक पळाले । कसाड बाजार झाला की जी मायबाप ॥ ६ ॥
मग बहु बळ हातगांवींचे । पाठ पोट उदरा गतींचें । मग तेथे खाणें दिजे दिवाळ हाकिमाचें । निघूं पाहे की जी मायबाप ॥ ७ ॥
शिष्टणापूरचे लोक फळफळां मुतूं लागले । मुर्चुदाबादेचें सुख सांडलें । अखंड खिडकी मोकळी पडली उठूं पळूं लागले । धीर धरवेना की जी मायबाप ॥ ८ ॥
मांडवगड चढावयाची शक्ति राहिली । ढोंगळापुरचीं मेटे बसलीं । चरण गांवींची चाल राहिली की जी मायबाप ॥ ९ ॥
आतां दया करी गुरुराया । एका जनार्दनीं लागे पायां । पतनाजातील लया । तुझे कृपेंकरून की जी मायबाप ॥ १० ॥