थाक
थाक रे थाक तुज नाहीं रे उंच नाक । तुझा देह करीन पाक ।
आपुली जन्ममरणाची गोष्टी झाक । सर सर मागें सर ॥ १ ॥
तुझा मायबाप ठाऊक आहे मला । माझ्या दासीच्या दासीपासून कीं रे झाला ।
गुरूगम्ये खूण नाहीं कळली तुला । कच्चें मडकें घेऊन जा आपलें घराला ॥ २ ॥
पाठमोरा उभा कां राहसी । सन्मुख पाहिलें नाहीं मसी ।
तरी उघड्या कर चारी वेशी । पळून जाशी कोणत्या दारीं रे ॥ ३ ॥
म्यां थाक कैकासी दिधला । चंद्र सूर्य उभा केला । इंद्र आहे येसणीला ।
काय रे सांगू मुला तुजला । भ्रांती पडळ झांकून कां नाहीं गेला ॥ ४ ॥
माझ्या मुलाचें एक मूल जाण । तूं ब्रह्मचारी होऊन ।
क्षणांत साठ पोरगे होऊन । एका कन्या दान रे ॥ ५ ॥
पाराशरासारखा ऋषेश्वर । दिवसाचे करून अंधकार । रतवी धिवरे नदीतीर ।
आगस्तिली लोपामुद्रा । हाही खेळ म्यांच केला ॥ ६ ॥
अवघें जाणून प्रपंच सार । त्याला माझा कीं आधार ।
जे राहती निराकार । एका जनार्दनीं तत्पर ॥ ७ ॥