वैदीण
अनादसिद्ध नवलाई झालें । स्वानंदें कुरकुला घेऊन शकुन सांगूं आलें । प्रेमाचें कुंकू भाळीं लाविलें । सद्भक्ती बोराठी हातीं धरिले ॥ १ ॥
बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल ॥ध्रु०॥
चार युगांची काखे पोतडी । दशावतार खेळे परवडी । सोहं शब्द बोलती चोखडी । माझा शकुन ऐके आवडी ॥ २ ॥
मच्छाबाई बुरगुंडा होईल । कर्माईबया० ॥ वर्हाईबया० ॥ नरसाईबया० ॥ वामनाईबया० ॥ बोधाईबया० ॥ कलंकाईबया० ॥ शकुन सांगूं आले बुरगुंडा होईल ॥ ३ ॥
गंगाईबया० ॥ भागाईबया० ॥ यमुनाईबया० ॥ कृष्णाईबया० ॥ येमाईबया० ॥ तुकाईबया० ॥ लक्ष्मीआईबया० ॥ मच्छ कच्छ वराह नारसिंह रूपिनी । भक्तालागीं स्तंभ फोडुनी । दैत्यांचा अंत करुनी । प्रल्हाद कुरकुला रक्षिलासे ॥ ५ ॥
वामन परशराम रूपिनी । हनुमंत कुरकुला सवे घेउनी । शकुन सांगावया लंका भुवनीं । सीतेकारणें गेलीस ॥ ६ ॥
कौरव पांडव सर्व मिळाले । शकुन सांगावया तुज पाचारिलें । अर्जुन रथीं बैसविलें । शकून कुरकुला घेउनी ॥ ७ ॥
ज्ञानदेव निवृत्ति सोपान । नामदेवादि संतजन । हे कुरकुले सवें घेऊन । भीमातटी आलीं असे ॥ ८ ॥
पुंडलिक कुरकुला पाहून । समचरण विटेवर ठेवून । भक्तालागीं आनुदिन । करकटीं राहिलासे ॥ ९ ॥
ऐसा शकुन सांगितला । एका जनार्दनीं आनंद झाला । संतीं जयजयकार केला । शकुन कुरकुला ऐकोनी ॥ १० ॥