विनंतीपत्र
श्रीमंत महाराज राजमान्य सकल गुणसंपन्न सकल वेदसंपन्न । शास्त्रसंपन्न ।
आत्मारामपंत वास्तव्य देह शरीर । चरणसेवेसी । जिवाजीचा साष्टांग नमस्कार ।
आपण कलमी पत्र दर्शविलें त्या प्रमाणें गांवची वहिवाट चालूच आहे ।
मध्यंतरीं गांवची रयत नायकेल तर इलाज नाहीं । ज्याचे ते आपआपले धर्माप्रमाणें वागतात ।
पुराण श्रवण । मनन । निदिध्यास । अर्चन । वंदन । दास्यत्व । पादसेवन ।
हेही आपआपल्या धर्माप्रमाणे चालू आहेत । यांत अधर्म कोणता होईल तो साहेंबांस लिहून कळवूं । एका जनार्दनी शरण ।
हें विनंती पत्र ॥ १ ॥