जोहार
जोहार मायबाप जोहार । मी विठोबा पाटलाचा महार । सांगतों सारासार विचार । ऐका की जी मायबाप ॥ १ ॥
गांव तों पांचा पाटलांचा । पंचवीस प्रजांचा । येथें सहा जणांचा । कारभार की० ॥ २ ॥
ऐजीची चाली फार । सारा ओढिताती कारभार । परी सहा जणांसी आधार । ऐजीचाच की० ॥ ४ ॥
बाप तुम्ही धन्यासी राजी राखा । नाहीं तरी शेवटीं होईल वाखा । मग कोणी नाहीं सखा । सोडवितां की जी मायबाप ॥ ५ ॥
कामाजी बाजी हुद्देदार । क्रोधाजी हा सरदार । यांचे वेगळाले विचार । ऐका की जी मायबाप ॥ ६ ॥
मदाजी बाजीचें वेगळें बंड । त्यासी मिळाला लोभ भावंड । अवघ्यानीं मिळोनि थोतांड । रचिलें की जी मायबाप ॥ ७ ॥
गांव तो होता चांगला । परी या सहाजणांनींच नाश केला । तुम्हीही त्यासीच मिळाला । हें बरें काय की जी मायबाप ॥ ८ ॥
परी ते राहतील एकीकडे । शेवटीं गांठ तुम्हांसीच पडे । मग इकडे न तिकडे । हो ना की जी मायबाप ॥ ९ ॥
ऐजीनें यांस कारभार दिला । यांनींच गांवांचा नाश केला । शेवटीं खाईल तुम्हांला । हें बरें की जी मायबाप ॥ १० ॥
गांवांतील तीन पाच थोर । पंचवीस त्यांचा विस्तार । घडी घडी त्यांचा समाचार । घेत जाव की जी मायबाप ॥ ११ ॥
रयतेचें फार हित करावें । धन्याचे कामासी रुजू असावें । धनी सेवेसी तत्पर व्हावें । लागतें की जी मायबाप ॥ १२ ॥
तुम्हांस धन्यानें दिला गांव । तुम्ही विसरलां त्याचे नाव । तलब आलिया लपवाया ठाव । मग कैंचा की जी मायबाप ॥ १३ ॥
तुम्ही धन्यासी करितां चोरी । ऐजीकडे करितां येरझारी । परी या सहाजणांसी सारी दोरी । तुमचीच की जी मायबाप ॥ १४ ॥
परी जेव्हां होईल ठावें । तेव्हां कळों येईल स्वभावें । घडी घडी आपुलें हित करावें । लागतें की जी मायबाप ॥ १५ ॥
जेव्हां तलब होईल धन्याची । तेव्हां तुम्हां मुदत कैंची । म्हणोनि सहा जणांची भीड धरूं नका की जी मायबाप ॥ १६ ॥
आतां ऐजीची आस्था सोडा । धन्याची बाकी हळुहळू झाडा । नाहीं तरी पायीं पडेल खोडा । प्रपंचाचा की जी मायबाप ॥ १७ ॥
आतां असो आधीं उपाधी । धन्याची भेट घ्यावी आधीं । तें मी सांगतों सुबुद्धी । ऐका की जी मायबाप ॥ १८ ॥
परि मी लहानसा दिसतों महार । मजवरी धन्याची अखत्यार । बहुत धन्याचा प्यार । मज नफरावर की जी मायबाप ॥ १९ ॥
सद्भाव शांतीसी घ्यावें । मज पाठीशीं तुम्ही असावें । जेथें धणी तेथें घर ठावें । मज नफरास की जी मायबाप ॥ २० ॥
श्रवणाची धरावी वाट । कीर्तनाचा चढावा घाट । विष्णु स्मरणाचा संघाट । आहे की० ॥ २१ ॥
पुढें आहे विश्रांतीचें स्थान । सज्जनाचें पादसेवन । दास्यत्व अर्चन वंदन । ध्यान मार्ग की० ॥ २२ ॥
तेथें जातां न लगे उशीर । समीप जनार्दन दातार । सख्य भक्तीचें मंदीर । आहे की० ॥ २३ ॥
पुढें आहे धन्याचें घर । तेथें जाऊन करावा जोहार । मुखीं जपावा परात्पर । जवळींचा की० ॥ २४ ॥
जेव्हां भेटी होईल धन्याची । तंव नित्य दिवाळी सुखाची । मग सर्व सत्ता तुमची । होईल की० ॥ २५ ॥
जेथें आहेत धनी । तेथें जावें लोटांगणीं । मग स्वतांच होईल मिळणी । आत्मसुखाची की० ॥ २६ ॥
या मागें गेले थोर थोर । नारदादि शुकेश्वर । धन्याचें दरबारी निरंतर । राहताती की० ॥ २७ ॥
जे जे या मार्गे गेले । ते धन्यासी रुजू झाले । जीवन्मुक्ति पावले । ऐका की० ॥ २८ ॥
जोहार मायबाप जोहार । गव्हाची रोटी तुपाची धार । धन्यांनीं पुरवावी अपार । मज नफरास की० ॥ २९ ॥
महार बोलतो म्हणोन नका जाऊं गर्वें । नाहीं तरी शरीर राहील हिरवें । आपुलें स्वहित होईल बरवें । तें करावें हिरवें ॥ ३० ॥
बाकीसाठीं आपली मूळभुई सोडाल । परमुलखा जरी जाल । तरी बाकीचा निकाल नाहीं की० ॥ ३१ ॥
धरा भाव भक्तीची कुळवाडी । काढा शेतांतींल पेंढी । नाहीं तरी पायीं पडेल बेडी । अविद्येची की० ॥ ३२ ॥
हे कायापूर नगरी । ब्रह्मयाने रचिली खरी । म्यां विवेकें जाणूनि बरी । आत्मरूपीं अर्पिली की० ॥ ३३ ॥
एका जनार्दनीं कुळवाडी मोठा । त्यानें बाकीस मारिला फांटा । अखंड कैलासीचा दारवंटा । मोकळा केला की० ॥ ३४ ॥
अखंड कैलासीचे राहणें । गुरुजनांचे हेंच देणें । सुख समाधी असणें । ऐका की जी मायबाप ॥ ३५ ॥