फुलवरा
पिण्डांड ब्रह्मांड अंतरीं दैवत भिन्नाकृती वो । शोधोनी पहातां अवघें चराचर व्यापक घन संभुती वो । भेदभाव त्रिगुणाचा रज तम सत्त्वाची आरती वो । ऐसें जाणोनी केली उभवणी । द्वैत सारुनी । परी तो मनीं । एक हरि अंकिला । तुज म्यां फुलवरा बांधिला ॥ १ ॥
जगदंबे । पूर्णकदंबे । जगउद्बोधें । देह तुज अर्पिला । तुज म्यां फुलवरा बांधिला ॥ध्रु०॥
आई भवानी थोर जाणोनि तिज म्यां उपासिलें वो । हातीं देऊन परडी तिनें मज भिकेसी लाविलें वो । खुळा पांगुळा करुनी आपणा जवळी बैसविलें वो । उदो अस्तुचे भरे । गरगरा फिरे । भूत वावरे । तो मज व्यर्थ शीण वाटला ॥ २ ॥
खंडोबासी नवस करुनी मुरळी होउनी बैसलें वो । आपुले जे कां सखे सज्जन ते विवंचुनी भरीं भरले वो । वारी मागतां पोट भरेना बहु श्रम पावलें वो। श्वानाचीये परी वृथा गुरगुरी । जाय चाचरी । परी तो हरि नाहीं देखिला ॥ ३ ॥
माझे घरीं पाहुणा भैरव येऊन बैसला वो । त्रिगुणाचा त्रिशूळ घेउनी प्रपंच विस्तारिला वो । जोगी बोलाउनी परत भरुनी भराड म्यां घातिला वो । ऐशीं वरदळें । सोशिलीं बळें । जालीं निर्फळें । सुखाचा लेश नाहीं देखिला ॥ ४ ॥
मुंजाबासी डांक घालुनी मेसाई आळविली वो । त्रिगुणाची तिवई करुनी त्यावरी बैसविली वो । धूप दीप नैवेद्य दाउनी पंचारती केली वो । तिनें मज नाडिलें । दुःख भोगिलें । सुख नासलें । मग म्यां ढकलून दिलें तिला ॥ ५ ॥
ऐशीं दैवतें केलीं अनंतें नवस बहु फेडिले वो । परि ते फलकट जाले शेवटीं गळां येउनी पडिले वो । बहु जाचिलें दुःख भोगिलें चौदिशीं व्यापिलें वो । जालें मी उदास । धरली कास । सोडुनी आस । पंढरी पाहून जीव माझा हर्षला ॥ ६ ॥
वैकुंठीचें निधान त्याचे असती जे प्रियकर वो । त्याची गांठ पडली तेणें दिधला अभयकर वो । त्याचे संगतीं गेलें भक्तीनें देखिलें भीमातीर वो । परात्पर सोयरा । पुंडलीक बरा । दिधला थारा । तेणें मज बुडतां हात दिधला ॥ ७ ॥
डोळा घालुनी अंजन घेउनी गेले मज राउळीं वो । विटेवरी जगदंबा एकाएकीं नयनीं देखिली वो । मनोभावें वरदळ वृत्ती देहाची खुंटली वो । एका जनार्दनीं भलें । द्वैत हरपलें । ऐक्य संचलें । जन्ममरणाचा पट फाटला ॥ ८ ॥