भूत
दादा वरले माळीं दिसतें । दोनी डोळे वटारितें । तें बा भेडसावितें । जवळीं गेल्या गिळूं पहातें ॥ १ ॥
तें बा दुःखदायक । तेणें शिणविले सिद्ध साधक । तें बा विशाळ भयानक । वेगीं गोंवी तिन्ही लोक ॥ २ ॥
तेणें मुंगीचा मार्ग घेतिला । मुळीहूनि शेंडा चढला । शेंड्यापासुनी खालत आला । तो तेथोनी निसटोनी गेला ॥ ३ ॥
तें बा अचोज चोजवेना । जवळी आहे परी दिसेना । तें बा झोंबिन्नले कळेना । झाडितां परी झडेना ॥ ४ ॥
तनमनुधनें शरण । एकनिष्ठ जयाचें मन । एका जनार्दनीं शरण । त्यासी सहजचि समाधान ॥ ५ ॥