पोपट
पढो माझ्या आत्मारामा । राधा कृष्णाचें हे ध्यान । पिंजर्यामध्यें गुंतलासीं । तुज सोडवील कोण ॥ध्रु०॥
चौर्यांयशी लक्ष योनी । वनीं तूं तरी हिंडसी । प्रमदा विष फळीं अति त्वरें धांव घेसी । घेऊनियां दोही पक्षी । पाहती तुज न्यावयासी ॥ १ ॥
पिंजरा घडविला पंचभूतांचा कुसरी । नव द्वारें सोळा सांधे । प्रभा पडली भीतरीं । लाविली प्राचीनाची दोरी । बांधिला निज मंदिरीं ॥ २ ॥
हिरवा तुझा रंग । गुंज वर्ण दोन्ही डोळे । चोंच आहे तुझी लाल । बोल तुझा हा मंजुळ । राघवा तूं बोल माझ्या सख्या अमोलिक बोल ॥ ३ ॥
अचळ तूं चंचळ मोठा हिंडे तीनही ताळ । तुला जपला काळ । बोका केव्हां घालिल गळ । जरी जाशी उडोनियां । पूर्व सुकृताचें फळ ॥ ४ ॥
सत्य गुरु दत्त दाता । तारक मंत्र तुज देई । तोच तुला सोडवील । यम करील काई । पावशील चिंतामणी । एका जनार्दनीं पायीं ॥ ५ ॥