जोहार
मी संतां घरचा महार । करितों जोहार ॥ध्रु०॥ विवेक नाईक माझें नांव । मीपण आलें अहंभाव । पंचभूतांचा वसविला गांव ।
रस्ते चार ॥ १ ॥
आत्मा धनी पाटीलबावा । मनाजी पाटील चालवी गांवा । बुधोबा शेट्या बळकट रावा । घरांत बसली असे आवा । खेळवी पोरे ॥ २ ॥
दहा इंद्रियें नऊ वेशी । राहातों दहावे खिडकीशीं । माझा मीच मूळ मिराशी । लक्ष संतांचें चरणापाशीं । सांगतों विचार ॥ ३ ॥
कउल शतवर्षाचे मूळ । कामाजी देशपांड्या खळ । क्रोध देशमुख सबळ । नेणें सरकार ॥ ४ ॥
हिशोब पडेल दमा सरकारीं । येईल यमाजीची स्वारी । जिवाजी धरुनी कारभारी । वोस पडेल नगरी सारी । देतील मार ॥ ५ ॥
शेवटीं नाहीं तुमचें धड । पडेल चौर्यांयशीचे कोड । मी तो राहीन एकीकडे । जीवाजीवर पडेल सांकडें । सांगतों सार ॥ ६ ॥
आवडी राखा मजवर हेत । मीच करीन तुमचें हित । नामस्मरणी लावा चित्त । एका जनार्दनीं विठ्ठल विठ्ठल म्हणत ।
हाचि निर्धार ॥ ७ ॥