गारुडी
संकासुरानें तप करून केलें ब्रह्मयाचें आराधन । तेथें वेद मूर्तिमंत जाण । संकासुरास नव्हतें मरण । आकाशीं जळीं काष्ठीं जाण । अस वर दिधला होता महान परमेष्ठीनें ॥ १ ॥
अरे रे वेद नेणें चोरून । संकासुराचा वध करून । चारी वेद आला घेऊन । गरगर चक्राकार भवंडी ॥ २ ॥
अघोर दैत्य मातले जाण । धरा रसातळास नेऊन । कूर्मरूपें घेतलें विष्णूनें । मेरुमांदार टाकिले घुसळून । वासुकीची बराडी करून । चवदा रत्नें काढिली कोण कोण । आललल त्यांचीं नांवें भिन्न भिन्न ॥ ३ ॥
वराहरूप घेउनी हरी । क्षिती घेतली दाढेवरी । महाबलाढ्य वराह हरी । दैत्यदानवांचा संहार करी ॥ ४ ॥
गुरगुर धरा तारिली कीं यानें । हिरण्यकश्यप मातले जाण । देश बांधून त्रिविधतापानें । त्यासी नाहीं जन्ममरण । घरीं दारी मृत्यु नाहीं म्हणून । जलीं काष्ठीं पाषाणीं जाण । प्रल्हाद पोटीं आला जाण । भूभार हरावया कारण । स्तंभी प्रगटला नारायण । अरे रे रे उदर टाकिलें चिरोन ॥ ५ ॥
पांचवा अवतार जाण ब्रह्मचारी । उभा राहिला बळिच्या द्वारीं । दान मागें श्रीहरी । बळी पाताळीं घातला द्वापारीं । बाण मारूनि वामनेत्र छेदिला । तरतरतररा माझा गारुडी वीरपुरा ॥ ६ ॥
सहावा अवतार झाला परशुराम । एकवीस वेळां निक्षेत्रीं धरा जाण । केली माझ्या स्वामीनें शीर मातेचें उडवुन । साच केलें पितृवचन । कामधेनुसी आला घेऊन । पहा पहा कीर्तीनें भरलें त्रिभुवन ॥ ७ ॥
सातवा अवतार अजनंदन । त्याचा पुत्र रघुपति जाण । केले अहिल्येचें उद्धरण । उदकावरी पाषाण तारून । कुंभकर्ण इंद्रजित जाण । अततता घेतला रावणाचा प्राण ॥ ८ ॥
आठवा वसुदेवाचा नंदन । त्याला कंसाचें बंधन । सात गर्भ वधिले त्याणें । महामाया आठवी जाण । यशोदेचे उदरीं घालून । बंदी उपजले आपण जण । द्वादश कळा छेदून । केलें नंदाचें मोचन । गोकुळीं घालवा नेऊन । तेथील माया आणिली उचलून । अष्ट वर्षे निवांत जाण । तुम्ही आतां सुखी रहाणें । कंस चाणूर मारीन । शिशुपाळाचा घेईन प्राण । मग ठेवीन धनुष्यबाण । देवकी तुझ्या गळ्याची आण । आजपासून पांच वर्षानें । एकदा भेटी देईन जाण । तोंवरी स्थिर करा मन । आतां करतों तुमचे ध्यान ॥ ९ ॥
नववा उभा विटेवरी । काय वर्णावी त्याची थोरी । मौनरूप धरून हरी । दोन्ही कर कटावरी । दृष्टि नासाग्री ठेविली सारी । भक्तजनांस कृपा करी ॥ १० ॥
दहावा कलंकी होणार । अश्वगमन करील सार । चंद्र सूर्य बुडेल आकार । मग कैचा चराचर । एका जनार्दन म्हणे कोण पाहणार ॥ ११ ॥