महारीण
जोहार मायबाप जोहार धनी । मी निराकाराची महारिणी । माझ्या धन्यासी निद्रा लागली म्हणोनी । संतसभेसी आलें की जी मायबाप ॥ १ ॥
माझें धनी एकुलते एक होते । तंव त्याशीं करमत नव्हतें । मग मी येऊनियां तेथें । उभी ठाकली की० ॥ २ ॥
मग म्यां येऊनियां काय केलें । धन्यास थापटून निजविलें । एवढें जगडंबर उभे केलें । परि सत्ता त्याचीच की० ॥ ३ ॥
ते मज मागें टाकुनी । धन्याकडे जाय मोहोरुनी । परि मी टांगेसी धरुनी । ओढोनी आणिले की० ॥ ४ ॥
ओढोनि आणिले कोण कोण सबळ । त्यांचीं नावें तुम्ही ऐका सकळ । विश्वामित्रासारखे ढिसाळ । ओढोनि आणिले की० ॥ ५ ॥
सर्वांमाजीं ब्रह्मा प्रौढ । तेणें मांडिली मज सर्व होड । त्यावर घालोनि कन्येचे लिगाड । तो पस्तावी पाडिला की० ॥ ६ ॥
ऋषिमाजीं पराशर । तो शास्त्रीं पुराणीं मज निर्भत्सी फार । परि दिवसाच करूनि अंधःकार । ढीवरेसी स्तविला की० ॥ ७ ॥
देवऋषिमाजीं नारदु । तो मशीं कधींच नव्हता मरदु । त्याचा द्वारकुमध्यें उतरविला मदु । साठ पोरें व्याला की० ॥ ८ ॥
वायुसुत हनुमान । तो मजशीं करी बहुत गुमान । परि मकरध्वजाचे वेळीं दांत विचकुन । उभा ठाकला की० ॥ ९ ॥
म्यां छळिलें व्यासाचें शुकदेव पोर । त्यानें माझीं निर्भर्त्सना केली फार । त्यानें काढोनि पायींची पैजार । मज तोंडावर मारिली की जी मायबाप ॥ १० ॥
ऐशा ऐशियाच्या केल्या गती । येर्हवी वायां गेलें नेणों किती । ते नागवे उघडे मज करूनि जिंकूं पहाती । त्यांचें तोंडा माती पडो की जी मायबाप ॥ ११ ॥
एका जनार्दनीं विनवी सर्वांपरी । जो करी पंढरीची वारी । तेथें बळ न चले निर्धारीं । मग येरा झोडपिती की जी मायबाप ॥ १२ ॥