नीति
नीति सांगतों ऐका एक । दास सभेचा सेवक । मन टाळूं नका एक । कोणी एक ॥ ध्रु०॥
सांडावरून जाऊं नये । लांच खाऊं नये । चोहट्यांत राहूं नये । कोणी एक ॥ १ ॥
अक्रीत घेऊं नये । इमान सोडूं नये । बैमान होऊं नये । कोणी एक ॥ २ ॥
सज्जनाशी विटूं नये । नीचासवें बाटूं नये । तस्कराशीं पुसूं नये । कोणी एक ॥ ३ ॥
भक्तिमार्ग खंडूं नये । कुभांड्यासी तंडूं नये । खळासंगें भांडू नये । कोणी एक ॥ ४ ॥
सत्पुरुषाशीं छळूं नये । शिवेचा गुंदा ढाळूं नये । केला नेम टाळूं नये । कोणी एक ॥ ५ ॥
सद्गुरुसेवा सोडूं नये । कुळधर्मासी मोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । कोणी एक ॥ ६ ॥
संपत्ति आलिया माजूं नये । अभिमानें फुंगू नये । सभा देखून लाजूं नये । कोणी एक ॥ ७ ॥
असत्य वाद करूं नये । खोटा संग धरूं नये । मोचकाशीं मैत्री करू नये । कोणी एक ॥ ८ ॥
भलते भरीं पडूं नये । अनाचार करूं नये । कपट मनीं धरूं नये । कोणी एक ॥ ९ ॥
जन्माआलीया स्वभावें । कांही सार्थक करावें । ऐसें मनीं विचारावें । कोणी एक ॥ १० ॥
एका जनार्दनीं भावें । संतचरणीं लीन व्हावें । सदा हरिनाम उच्चारावें । कोणी एक ॥ ११ ॥