माळी
आत्माराम आपण वनमाळी ।
ज्ञानकुदळी घेऊनि वाफे चाळी ।
जाई जुई लाविल्या दोन्ही वोळी ।
निजयोगिनी शिंपिती वेळॊवेळी ॥१॥
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वो ।
या मळ्याचे सारखे चारी कोन हो ।
रक्षण तेथे ठेविलें पाच जण हो ।
प्राणापान व्यान उदान सम हो ॥२॥
बावन पायर्या रे विहीर निर्धारी ।
सतत उपसा होतसे परोपरी ।
ऎसी विहीर वोळली क्षीरसागरी हो ॥३॥
वोडवेचे चाक सत्रावी घडघडाट हो ।
सोहं दोर लाविला याला नीट हो ।
शांतीक्षमेची राहतसे मोट हो ।
निजनयना चालविला पाट हो ॥४॥
हाती खुरपे घेतले विवेकाचे ।
समूळ मूळ खुरपिले वासनेचे ।
प्रत्यक्ष फळ लाधले आत्म साचे हो ।
एका जनार्दनी माळी तेथे नाचे हो ॥५॥