फुगडी
तुम्ही आम्ही दोघीजणी मिळुनी जी सखये । मन बुद्धि चित्त टाकी पिळुनी जी सखये ।
जीव शिव भेदभान मिळुनी जी सखये ॥ १ ॥
फुगडी फू नको होऊं फू । फू फू फू फू फुगडी फू ॥ ध्रु०॥
तुझा माझा हात धरुनी खेळूं जी सखये । पंचरंगीं चुडे करीं जडो जी सखये ।
पंचवीस याची जडी जाळूं जी सखये ॥ २ ॥
नेट पाय दोघी उभी राहूं जी सखये । कंठीं हात ठेवूं हरी डोळां पाहूं जी सखये |
अखंडित ब्रह्मानंदसुख लाहूं जी सखये ॥ ३ ॥
खेळतां खेळतां जाहला जी सखये । प्रवृत्ती निवृती भेद खुंटला जी सखये । एका जनार्दनीं एकी एकसा जी सखये ॥ ४ ॥