महालक्ष्मी
नमो निर्गुण निराकारा । आदि मूळ माया तूं आकार । महालक्ष्मी तूं साचार । उघडे द्वार ठेउनी बैसलीस बया ॥ १ ॥
बया दार लाव । बया दार लाव ॥ध्रु०॥
घेउनी दहा अवतार । करिती दुष्टांचा संहार । आकार सारुनी निराकार । काय बैसलीस । बया दार लाव ॥ २ ॥
बैसलीस क्षीरसागरीं । शेषाचे पलंगावरी । जय विजय द्वारीं । प्रेम दिवटे तिष्ठती । बया दार लाव ॥ ३ ॥
ते वेळीं देव आले । शंखासुरें म्हणती पीडिले । वेद चारी चोरूनि नेले ब्रह्मयाचे । बया दार लाव ॥ ४ ॥
त्वां मत्स्यरूप धरून । समुद्रात बुडी देऊन । शंखासुरास वधून । वेद घेउनी आलीस । बया दार लाव ॥ ५ ॥
सुर असुर मिळाले । समुद्र घुसळावया गेले । वासुकीचे दांवें लाविलें । तेथें संकटीं पडिले । बया दार लाव ॥ ६ ॥
तूं कूर्मरूप धरून । मंदराचळ पृष्ठीं वाहून । चवदा रत्नें काढून । इंद्र सुखी केला । बया दार लाव ॥ ७ ॥
वरदे हिरण्याक्ष माजला । पृथ्वी काखेस घेउनी पळाला । चंद्र सूर्य घेउनी गेला । अंधःकार पडिला । बया दार लाव ॥ ८ ॥
त्वां वराह रूप धरून । दैत्यास क्रोधें वधून । पृथ्वी दाढेवरी धरून । चंद्र सूर्य आणिला । बया दार लाव ॥ ९ ॥
दैत्य कुळीं हिरण्यकश्यपु जन्मला । तेणें तुझा भक्त गांजिला । तें तें न पाहवें तुजला । त्वां उग्र रूप धरिलें । बया दार लाव ॥ १० ॥
त्वां क्रोधें स्तंभ फोडून । नारसिंह रूप धरून । दैत्यासी वधून । प्रल्हाद दिवटा रक्षिला । बया दार लाव ॥ ११ ॥
दैत्यकुळीं बळी जन्मला । तेणें पुण्याचा उत्कर्ष केला । देखोनी इंद्र घाबरला । शरण आला बया तुज । बया दार लाव ॥ १२ ॥
वामन रूप धरून । बळीस पाताळीं घालून । शुक्राचा एक नयन फोडिलास । बया दार लाव ॥ १३ ॥
सहस्त्र अर्जुनें पीडिलें । देवा तेणें गांजिलें । ऋषीचे याग खोळंबले । हे न पाहावे तुझेनी । बया दार लाव ॥ १४ ॥
मग तूं परशुराम रूप धरून । सहस्त्र अर्जुनास वधून । मातेचें शिर छेदून । क्षत्रिय कुळ निवटिलें । बया दार लाव ॥ १५ ॥
शिव वरदे रावण कुंभकर्ण । तेहतीस कोटी बंदीं घालून । नवग्रह पायरी करून । राज्य करी आनंदें । बया दार लाव ॥ १६ ॥
सीतेचेनी कैवारें । रावण मारिला सहपरिवारें । अठरा पद्म वानरें । गोंधळ मांडिला लंकेसी । बया दार लाव ॥ १७ ॥
कौरव पांडव मिळाले । कुरुक्षेत्रीं युद्ध मांडिलें । अठरा अक्षौहिणी दिवटे भले । नाचती रणकल्लोळीं । बया दार लाव ॥ १८ ॥
बौद्ध अवतार घेऊन । विटे समचरण ठेवून । पुंडलीक दिवटा पाहून । तयेचि द्वारीं गोंधळ मांडिला । बया दार लाव ॥ १९ ॥
आणिक दिवटे अपार । निवृत्ति ज्ञानदेव सोपान खेचर । मुक्ताई जनाबाई विसोबा गोरा कुंभार । रोहिदास चोखा सज्जन नाचती । बया दार लाव ॥ २० ॥
सांवता नामा दामा जाण । नारा मादा गोंदा विठा कबीर कमाल पूर्ण । सेना जगमित्र नरसी ब्राह्मण । दिवटे तिष्ठती । बया दार लाव ॥ २१ ॥
आषाढी कार्तिकी गोंधळ मांडिला । उदो उदो ऐसा शब्द झाला । कामक्रोधादिकां पळ सुटला । उदो शब्द ऐकोनी । बया दार लाव ॥ २२ ॥
पुढें कलीचा प्रथम चरण । दैवतें राहिली लपून । तीर्थें सांडोनी महिमान । अठरा वर्ण एक झाले । बया दार लाव ॥ २३ ॥
म्लेंच्छें गांजिलें देवभक्तां । महिमा उच्छेदिला सर्वथा । न चले जप तप तत्त्वतां । एकरूप सर्व झालें । बया दार लाव ॥ २४ ॥
मत्स्याई बया दार लाव बया । कुर्माई बया दार लाव बया । वर्हाई बया दार लाव बया । नरसाई बया दार लाव बया । वामनाई बया दार लाव बया । परसाई बया दार लाव बया । रामाई बया दार लाव बया । कृष्णाई बया दार लाव बया । बौद्धाई बया दार लाव बया । कलंकाई बया दार लाव बया । महालक्ष्मी दार लाव बया ॥ २५ ॥
उदे उदे उदे बया दार लाव ॥ २६ ॥
काम महिषासुर मातला । तेणें विषय गोंधळ मांडिला । अज्ञान पोत पाजळला । आशा संबळा लाऊनी । बया दार लाव ॥ २७ ॥
क्रोध वेताळ दारुण । मातलासे मदें करून । मत्सर मद साह्य होऊन | भक्ति वैराग्य बुडविलें । बया दार लाव ॥ २८ ॥
दंभे झोटिंग महाबळी । अहंकार मुंज्या छळी । आशा मनशा तृष्णा घेऊनी गोंधळी । विषयकल्लोळीं नाच तूं । बया दार लाव ॥ २९ ॥
कल्पना इच्छा वासना भूतावळी । औट कोटिया मिळाली । नाचती विषयकल्लोळीं । भोग दिवटी घेऊनी । बया दार लाव ॥ ३० ॥
ऐसे तुज न पाहवे जाण । म्हणोनी बैसलीस मौन धरून । विटेवर समचरण ठेऊन । निवांत रूपें । बया दार लाव ॥ ३१ ॥
एका जनार्दनीं शरण । विठ्ठलनामें अंबा जाण । पुंडलीक दिवटा अवलोकून । निवांत रूपें बैसली । बया दार लाव ॥ ३२ ॥